Search
Sign In

उकडिचे मोदक

उकडिचे मोदक

कोकणातील उकडीचे मोदक म्हणजे खवैयांसाठी स्वर्ग. गणपती बाप्पाचा हा आवडता नैवेद्य. त्या निमित्ताने दर संकष्टीला व गणेशोत्सवात कोकणात घराघरात हमखास बनवण्यात येणारा गोड पदार्थ. मोदक दिसायला जितका सुबक तितकाच चविष्ट. पूर्णपणे उकडलेला असल्याने पचायला सोपा तसाच बनवायला तितकाच कठीण. मोदक बनवणे कि सुद्धा एक खास कला. कोकणात जवळ जवळ सगळ्याच घरात मोदक बनवण्यात हातखंडा असलेली एक तरी सुग्रण असतेच. तिने सुबक चविष्ट मोदक बनवावेत आणि आपण त्यावर यथेच्छ ताव मारावा, यापेक्षा स्वर्ग तो काय !!!

पांढऱ्या शुभ्र तांदळाचे पीठ घ्यायचे ते उकळत्या पाण्यात टाकून त्याची उकड घ्यायची. नंतर ते पीठ मळायचे. एकीकडे ताजे नारळ फोडून खिसुन खोबरे तयार ठेवायचे (या ताज्या खिसलेल्या खोबऱ्याची चिमूट तोंडात घरातल्या छकुल्यांनी टाकायचीच). नंतर ते गुळाच्या पाकात घोळायचे, ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे त्यात चवीप्रमाणे वेलची किंवा जायफळ घालायचे. लालसर रंग आला कि हे खोबरे तयार. उकडलेल्या पीठाचे गोळे करून मधोमध खोलगट आकार करून वाटी बनवायची, त्यात खोबरे भरून वाटीच्या बाजूने चिमटीच्या साहाय्याने पाकळ्या बनवायच्या, नंतर सर्व पाकळ्या एकत्र करून उंच टोकदार कळी बनवायची. झाला मोदक तयार. हि कृती सांगायला किंवा लिहायला सोपी आहे, परंतु बनवायला तितकीच कठीण. असे मोदक तयार झाले कि मोदकपात्रामध्ये चांगले उकडून घ्यायचे. पूर्वी तांब्याच्या धातूचे टाके मारलेली मोदकपात्रे असायची. आत्ता स्टील ची मोदकपात्र असतात. तसेच गावाकडे अंगणात किंवा मागच्या दारी हळदीची पाने हमखास मिळतात. मोदक उकडताना हळदीच्या पानावर ठेवले तर त्याला खूप छान हळदीचा सुवास येतो. प्रत्येक उकडीसोबत एक पिठाचा थापटा नक्की असतो. हळदीच्या हिरव्या कंच पानांवर ठेवलेले पांढरे शुभ्र वळणदार मोदक पाहून जणू स्वर्ग दोन बोटांवर उरलाय असे वाटते. आणि कधी एकदा ते आपल्या पानात येतेय असे होऊन जाते. ( कोकणात सणासुदीला केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत आहे. ) मोदक पूर्णपणे उकडून झाले कि त्याला एक प्रकारची चकाकी येते. नंतर मोदकपात्र चुलीवरून उतरवून थोडे थंड झाले कि हळुवार पणे बाहेर काढावेत. काही जण साजूक तुपासोबत तर काही जण मस्त झणझणीत लोणच्यासोबत तर काही जण मोदक नुसतेच खातात – पण ताटात मोदक दिसले मागचा पुढचा विचार न करता यथेच्छ ताव मारलाच पाहिजे.

गरम गरम ताजे मोदक जितके खायला चविष्ट तसेच काही उरलेले मोदक दुसऱ्या दिवशी तव्यावर थोडे तेल टाकून परतून घ्यायचे. मधूनच पांढरे व मधूनच लालसर खरपूस परतलेले मोदक सकाळी नाश्त्याला खायचे. असा नाश्ता दुर्मिळच.

असे हे कोकणाचे खास वैशिष्ट्य असलेले मोदक कोकणात येऊनच अनुभवा.

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password