पद्मदुर्ग – छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला एक अभेद्य किल्ला. मुरुडजवळच्या खोल समुद्रामध्ये एका मोठाल्या खडकाळ बेटावर बांधलेला स्वराज्यातील महत्वाचा किल्ला. साधारणतः कमळाच्या आकाराचा हा किल्ला, म्हणून नाव पद्मदुर्ग. राजपुरीच्या खाडीमध्ये असलेला सिद्दीच्या जंजिरा जिंकण्यासाठी महाराजांनी पद्मदुर्ग बांधला.
दि ४ फेब्रुवारी रोजी पद्मदुर्ग जागर संस्था मुरुड व कोकण कडा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मदुर्ग जागर २०२४ हा सोहळा साजरा झाला. या वेळी मुरुड मधील बरेच शिवभक्त तसेच महाड व महाराष्ट्राच्या इतर भागातून सुद्धा शिवभक्त या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आले होते. अलिबाग ऑनलाइन ची टीम सुद्धा पोचली पद्मदुर्गाकडे.
अतिशय मंगल वातावरणात व छत्रपतींच्या पोवाड्याच्या साथीने सोहळ्याला सुरुवात झाली. सुरुवातीला गडाच्या प्रवेशद्वारापाशी गडपूजन झाले, यजमानांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले. नंतर गडाच्या आतील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये इतर कार्यक्रम पार पडले ज्यामध्ये महाराजांचा अभिषेक, नंतर आरती झाली व नंतर महाराजांची पालखीची गडाच्या तटबंदी वरून एक प्रदक्षिणा झाली. यावेळी सर्व जण पालखीसोबत तटबंदीवरुन चालत गेले. नंतर गडाच्या मागच्या बाजूला असलेल्या कोटेश्वरी या मुरुडच्या ग्रामदेवीची पूजा व आरती करण्यात आली. पूजा व इतर विधी चालू करणारे गुरुजी इतक्या आत्मीयतेने मंत्र उच्चरण करत होते कि तेथील उपस्थितांना क्षणभर राजवैभव अनुभवायला मिळाले. नंतर विविध कलाकारांनी साहसी प्रात्यक्षिके करून दाखवली, जी पाहताना सर्वच मंत्रमुग्ध झाले.
अतिशय प्रसन्न वातावरणात का मंगल सोहळा पार पडला. गडावर ऊन फार नसल्याने फारसा त्रास झाला नाही सकाळी गडावर पोचल्यावर नाश्त्याची सोय केली होती. सर्व कार्यक्रम पार पडल्यावर जेवण सुद्धा देण्यात आले. यावेळी अलिबाग ऑनलाइन च्या टीम ने पद्मदुर्ग जागर संस्थेच्या अध्यक्षांची भेट घेतली.
यावेळी प्रकर्षाने जाणीव झाली ती गडाच्या स्वच्छतेची आणि सर्व शिवभक्तांच्या सोयीची केलेली व्यवस्था यांची. पद्मदुर्ग जागर संस्था मुरुड व कोकण कडा मित्र मंडळ यांचे खूप खूप आभार. आता प्रतीक्षा पुढील भेटीची. धन्यवाद.
या मंगल सोहळ्याची काही क्षणचित्रे