Search
Sign In

चला अलिबागच्या पावसाळी सफरीवर!

अलिबाग म्हटले कि समुद्रकिनारे आणि गडकिल्ले. त्यासोबतच येथील पाऊस हि तेवढाच प्रसिद्ध. मुसळधार पाऊस आपण ज्याला म्हणतो तो पाऊस पूर्ण कोकण किनारपट्टीवर पाहायला मिळतो. अलिबागहि त्याला अपवाद नाही. आता आपल्याला प्रश्न पडतो कि पावसात अलिबागमध्ये काय पाहायचे ? तर याचे उत्तर द्यायचा हा अलिबागऑनलाईन ® चा छोटासा प्रयत्न.

पाऊस सुरु झाला कि अलिबाग आणि परिसर पूर्ण हिरवागार होऊन जातो. विविधरंगी फुले, भाज्या, फळे, शेतीच्या कामांची लगबग, आणि श्रावणातील सण यांनी अलिबाग शहर अगदी बहरून जाते. महिनाभर चांगला पाऊस झाला कि परिसरातील खळखळणारे फेसाळ धबधबे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात आणि अलिबागकरांना वेद लागतात ते ह्या धबधब्यांना भेट देण्याचे.

 भातलावणी -

अलिबागच्या आजूबाजूला जुलै महिन्यामध्ये कुठेही जा. रस्त्याच्या कडेला तुम्हाला शेतांमध्ये भातलावणी चालू असलेली नक्की दिसेल. पुण्या मुंबईमध्ये तुम्हाला पैसे देऊन भातलावणी चे कार्यक्रम आखणारे बरीच मंडळी असतात, पण अलिबागमध्ये हा आनंद तुम्हाला सहज कुठेही नक्की घेता येईल. थांबवा तुमची गाडी रस्त्याच्या कडेला आणि उतरा शेतामध्ये आणि शिका भातलावणी. सोबत येथील शेतातील लावणीची गाणी असतातच. रोजच्या बॉलीवूड आणि हॉलिवूड पेक्षा सर्रस. त्या काळ्या मातीचा मऊ स्पर्श तुमच्या आठवणीत नक्की राहील.
Monsoon Rice

 समुद्रकिनारे

समुद्राचे रूप प्रत्येक ऋतूमध्ये वेगळे तितकेच मनमोहक. कधी शांत नितळ, कधी खळाळणारे आणि फेसाळणाऱ्या लाटा असलेलं, तर कधी खवळणारे रौद्र रूप. भर पावसामध्ये समुद्रकिनारे शक्यतो निर्मनुष्य असतात. भरतीच्या वेळी कानी पडतो तो फक्त लाटांचा आवाज आणि मग बाकी जगाचा विसर पडतो, त्या सागराच्या अथांगपणाची जाणीव होते. अशा या सागराचा अनुभव पावसाळ्यामध्ये किनाऱ्यावर बसून एकदा तरी घ्यावाच.
समुद्रकिनारे

 कनकेश्वर

कनकेश्वराच्या उंच डोंगराचे पावसातील ढगांच्या लपंडावातील निसर्गरम्य रूप मन अगदी प्रफुल्लित करून टाकते. डोंगर तसा उंच असला तरी जवळच्या समुद्रावरून आलेल्या ढगातून वाट काढत कधी पार केला जातो कळत नाही. वाटेमध्ये असंख्य छोटेमोठे झरे. मग वर गेल्यावर पाण्याने तुडुंब भरलेल्या ब्रह्मकुंडामध्ये मनसोक्त डुंबणे. नंतर कनकेश्वराचे दर्शन घेतल्यावर मस्त गरमागरम मिसळपाव, मंडळी सुख म्हणतात ते अजून काय ? तर नक्की या कनकेश्वराच्या दर्शनाला.
कनकेश्वर

 सिद्धेश्वर धबधबा

अलिबागचे खरे सौन्दर्य पाहावे तर पावसाळ्यात. सगळीकडे हिरवेगार गालिचे, खळाळून वाहणाऱ्या नद्या आणि उंच धबधबे. असाच एक सुंदर मनमोहक धबधबा म्हणजे सिद्धेश्वरचा धबधबा. तीन बाजूने गर्द हिरवे डोंगर आणि मधोमध पांढरा शुभ्र असा उंचावरून फेसाळत खाली कोसळणारा धबधबा पाहिला कि मन प्रसन्न होते. पावसाळ्यात या परिसराचे सौदर्य फारच अप्रतिम असते.
सिद्धेश्वर धबधबा
Siddheshwar waterfall

 कोंडी धबधबा

शेतातील बांधावरून स्वतःला सावरत ३ ते ४ किमी चालून गेल्यावर दिसते ते फेसाळणारे, पांढरे शुभ्र, खळाळणारे, आणि प्रचंड आवाज करणारे असे १५ ते २० फुटांवरून कोसळणाऱ्या पाण्याचे मनमोहक दृश्य – म्हणजेच कोंडी येथील धबधबा. अलिबागपासून जवळच असलेला हा धबधबा हे पावसाळ्यामधील प्रमुख आकर्षण बनले आहे.
कोंडी धबधबा

 गारंबी धबधबा

घनदाट व हिरवेगार जंगल, शांत वातावरण, खळाळणाऱ्या पाण्याचा सुमधुर आवाज, मधूनच येणारी उन्हाची सुखावणारी तिरीप, आणि सोबतीला पक्षांचा किलबिलाट. निसर्गाचे सौन्दर्य आणि किमया काय असते त्याचा खरा प्रत्यय येथे येतो. मुरुडपासून जवळच असलेले गारंबी धरण आणि धरणालाच लागून मोठाले कातळ आणि डोंगर उतार आणि पावसामध्ये येथे तयार होणारे खळखळणारे मनमोहक धबधबे. एखाद्या चित्रपटामध्ये दिसावा असा सुंदर देखावा.
गारंबीधबधबा

 तीनवीरा धरण

पेण हुन अलिबागला येताना पेझारी नंतर तीनवीरा हे धरण लागते. हे छोटेखानी धरण महिनाभराच्या पावसाने पूर्णपणे भरून वाहू लागते. धरणाच्या बंधाऱ्यावरून फेसाळणारे पांढरे शुभ्र पाणी पाहताना फार छान वाटते. धरणाजवळच एक बायोडायव्हर्सिटी गार्डन आहे. येथूनच धरणाच्या मागच्या बाजूला उंच सागरगड दिसतो.
तीनवीरा धरण
Teenvira Dam

 रामधरणेश्वर

पावसाळ्यामध्ये छोटासा ट्रेक करायला खूप छान ठिकाण आहे हे. सुरुवातीला गावातून जाणारा रस्ता काही अंतरावर डोंगराला जोडतो आणि मग जसजसे आपण चढत जातो तसतसे येथील सौन्दर्य आपल्याला भुरळ घालते. मधेच लागणारा रामधरण तलाव आणि पलीकडे धबधबा. मध्ये मध्ये बरेच छोटे मोठे झरे, एका ठिकाणी दिसणारे छोटे रांजणखळगे, आणि शेवटी उंचावर असलेले रामधरणेश्वर मंदिर. येथून कित्येक किमी अंतरावरचे दिसणारे मनमोहक दृश्य.
रामधरणेश्वर
Ramdharaneshwar

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password