Search
Sign In

इतिहासाचे मुकसाक्षीदार

इतिहासाचे मुकसाक्षीदार

अलिबागला हजारो वर्षांचा इतिहास असल्यामुळे येथे अनेक शिलालेख, वीरगळ, गधेगळ, तसेच सतीशिळा सापडतात. ह्या सर्वच कलाकृती त्या त्या काळाचा इतिहास सांगतात. काही चित्र स्वरूपातील तर काही लेख स्वरूपातील, पण ह्या प्रत्येक कलाकृतीमध्ये शेकडो कदाचित हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास कोरला आहे. अशा ह्या इतिहासाच्या मुकसाक्षीदार शिळा, ह्यांचा घेतलेला छोटासा आढावा -

Visit Website

गध्देगळ -

गध्देगळ हा पूर्वीच्या राजामहाराजांनी परिसरातील लोकांना सदरच्या जमिनीच्या संदर्भात घालुन दिलेल्या नियम व अटी तंतोतंत पालन कराव्यात यासाठी दिलेला धमकीवजा ईशारा असे. बर्याचदा देवस्थानांची अथवा दान बक्षीस दिलेल्या स्थावर संपत्तीचे रक्षण व्हावे व कोणीही गैरवापर करू नये म्हणून ही शापवाणी दगडावर कोरली जात असे. त्यावर सूर्य चंद्र म्हणजे सूर्य चंद्र असे पर्यंत हे शाश्वत राहील.

About Alisa Noory

आक्षी शिलालेख -

आक्षी परिसरात कोकण शिलाहारवंशीय नृपती केशिदेवराय यांचा व देवगिरी यादव नृपती रामचंद्रदेवः यांचा असे दोन शिलालेख सापडले आहेत. हे शिलालेख म्हणजे गधेगळ होत. एक इ. स. १०१२ तर दुसरी इ. स. १२१३ असा उल्लेख सापडतो.

आक्षी शिलालेख

About Alisa Noory

मुरुड -

अलिबागपासुन ५० किमी अंतरावर असलेल्या ऐतिहासिक मुरुड मध्ये केने पाखाडीमध्ये एक गद्धेगळ सापडली आहे. साधारणतः ३ ते ४ फूट उंचीची हि गधेगळ फार जुन्या इतिहासाची साक्ष देते. श्री केने यांच्या वाडीमध्ये काम करताना हि शिळा सापडली आहे.

About Alisa Noory

मुळे -

अलिबागजवळील मुळे या गावात जाणाऱ्या रस्त्यालगत तळ्याजवळ एक गधेगळ दिसून येते. पण हि शिळा सध्या फार दुर्लक्षित स्थितीत पडून आहे. मुळे गावातील तळ्याजवळ एक विहीर आहे, ह्या विहिरींसमोर हि शिळा ठेवलेली आहे. ह्या शीळेवर सुद्धा चंद्र व सूर्य कोरलेले दिसतात .

विरगळ -

वीरगळ – विरगळ ही त्या त्या क्षेत्रासाठी शौर्य पराक्रम गाजवुन आपल्या प्राणाची आहुती देणार्या विराचे स्मारक किंवा स्मरण म्हणुन शिला कोरली जाई. ह्या वीरगळीवर कधी कधी वीरपुरुषाची आकृती तर कधी युद्धप्रसंग सुद्धा कोरलेले आढळतात. विरगळी ह्या 1500 ते 1700 च्या काळातल्या जास्त आढळून येतात. बऱ्याच ठिकाणी ह्या वीरगळींची नित्यपणे पूजा केली जाते. अशा या ऐतिहासिक पराक्रमाच्या मुकसाक्षीदार वीरगळी, ह्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे

About Alisa Noory

मुरुड क्षेत्रपाल -

मुरुड येथे दत्ताच्या टेकडीवर क्षेत्रपाल नावाचे देवस्थान आहे, क्षेत्रपाल म्हणजे त्या क्षेत्राचे पालन किंवा रक्षण करणारा, हे एक शंकराचे देवस्थान आहे ह्या मंदिराच्या मागे एक वीरगळ दिसून येते, ह्या वीरगळीचा नक्की काळ माहित नाही पण तिच्या झिजलेल्या स्वरूपाकडे पाहून हि नक्कीच फार पुरातन असावी असा अंदाज येतो.

धेनूगळ -

शिलाहार राजांच्या काळात ( इ. स. ८१० – इ. स. १२६०) जमीन दान केलेल्याचा लिखित पुरावा म्हणून धेनूगळ हे सरकारी दानपत्राप्रमाणे बनवले जात. यावर गाय आणि वासराचे शिल्प असते त्यामुळे याला धेनूगळ ( गाय – वासरू शिल्प/शिळा) अथवा गोवत्स शिल्पही म्हणतात. दान दिलेल्या गावाची अथवा एखाद्या विशिष्ट हेतूसाठी जमीन दान दिली असता त्या जमिनीची सीमा दाखवण्यासाठी हा दगड वापरला जात असे. शिलाहार राजांच्या काळात दगडांवर दानाचा मजकूर लिहून ते जाहीर करण्यासाठी व प्रजेला लिहिलेले नियम पाळण्यासाठी असे दगड बनवले जायचे. आजही अलिबागच्या आजूबाजूला असे दगड पहायला मिळतात पण असे गाईचे शिल्प असणारी शिळा फार क्वचितच दिसते. या आयताकृती दगडांवर वरच्या बाजूस सूर्य व चंद्र असतात. ज्याचा अर्थ असा होतो की या शिळेवर लिहिलेला नियम चंद्र व सूर्य आकाशात असे पर्यंत बांधील राहील. शिळेवर वरच्या बाजूला चंद्रकोर खूप ठळकपणे दिसते व त्यावर लहान वर्तुळाकार सूर्य कोरलेला दिसतो. त्याखाली गाय व वासराचे शिल्प आहे. गाय हे राजाचे प्रतीक असून वासरू हे प्रजेचे प्रतीक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो असे यातून संबोधले आहे. याच्या खाली काही जागा मोकळी सोडलेली दिसते. काही ठिकाणी या दगडांवर शिलालेखही कोरलेले दिसतात.

About Alisa Noory

बामणोली -

अलिबागपासून रेवसकडे जाताना खडताळ पुलापासून साधारण अडीच किलोमीटरवर बामणोली नावाचे गाव आहे. याच बामणोली गावात एक ऐतिहासिक धेनुगळ पाहावयास मिळते. येथील गावकऱ्यांनी हि शिळा सुस्थितीत ठेवली आहे, एक छोटा चौथरा व छोटेखानी छप्पर सुद्धा केले आहे, या शिळेची पूजा अर्चा केली जाते

सतीशिळा -

पूर्वीच्या काळात पतीच्या निधनानंतर सती जायची प्रथा होती. एखादा वीर युद्धामध्ये वीरगतीस प्राप्त झाल्यास त्याची पत्नी त्याच्या मागे सती जायची. तिच्या स्मृतीसाठी ह्या शीळा कोरल्या जात. ह्या शिळेवर वरच्या बाजूस चंद्र सूर्य कोरलेले असत. तर मधल्या जागेमध्ये सतीचा एक हात काटकोनामध्ये वरच्या बाजूस पाच बोटे दिसतील अश्या स्थितीमध्ये कोरलेला असे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत सतीची महती राहील. नंतरच्या काळात सती जायची प्रथा बंद झाली व सतीशिळा कोरणेही बंद झाले

About Alisa Noory

कोर्लईच्या सतीशिळा -

अलिबागपासून २० किमी अंतरावरचे एक ऐतिहासिक गाव. गावातून कोर्लई किल्ल्यावर जाण्याच्या रस्त्यावर उजव्या बाजूला एक जुने शंकराचे मंदिर आहे. या मंदिरासमोर एका मोठ्या झाडाच्या जवळ दोन सतीशिळा दिसून येतात. यातील एक शिळा अजूनही पूर्णपणे स्पष्ट दिसते तर दुसरी शिळा थोडी झिजलेली दिसून येते. दोन्ही शिळांवर सतीचा हात काटकोनामध्ये वरील बाजूस कोरलेला दिसून येतो. वरच्या बाजूला चंद्र व सूर्य कोरलेले दिसून येतात.

About Alisa Noory

सराईमधील सतीशिळा:-

चौलपासून काही अंतरावर सराई नावाचे अजून एक ऐतिहासिक गाव आहे. येथे रस्त्याच्या डाव्या बाजूस सोमेश्वराचे जुने मंदिर आहे. याच मंदिराच्या परिसरामध्ये एका वडाच्या झाडाखाली एक सतीशिळा ठेवलेली आढळते. सतिशीळेवरील कोरीव काम अजूनही सुस्थितीत आहे. या सतीशिळेचे संवर्धन करून ती सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. येथे जवळच्या वडाच्या झाडाच्या पायथ्याशी बऱ्याच प्रमाणात पुरातन मूर्ती, शिवपिंडी, दगडी दिवे, ठेवलेले दिसतात.
वर उल्लेख केल्याप्रमाणे गधेगळ, वीरगळ, धेनुगळ, सतीशिळा अशा प्रकारच्या शिलालेखांसोबत काही फक्त लेखी स्वरूपातील शिलालेख सुद्धा अलिबाग आणि परिसरात सापडतात.

About Alisa Noory

वरसोली बेलेश्वर मंदिर शिलालेख –

वरसोली येथे बेलेश्वराचे फार जुने शिवमंदिर आहे, साधारणतः सन ११११ च्या दरम्यानचे हे मंदिर आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला एक शिलालेख सापडतो. त्याच्याकडे कोणी लक्ष न दिल्यामुळे तो दुर्लक्षित आहे. मंदिराच्या आजूबाजूला बरेच ऐतिहासिक अवशेष दिसून येतात. जवळच एक फार जुनी पण अतिशय दुर्लक्षित स्वरूपातील पोखरण सुद्धा आहे . या शिलालेखाचे वाचन व सर्व अवशेषांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

About Alisa Noory

नागाव भीमेश्वर मंदिर शिलालेख -

अलिबागजवळ नागाव येथे रस्त्यालगत एक जुने शिवकालीन भीमेश्वराचे मंदिर आहे. येथे एक २ फूट चार इंच लांब व दीड फूट रुंद शिलालेख सापडतो. हा शिलालेख शके १२८८ मधील असून साधारणतः २८ ओळींचा संस्कृत शिलालेख आहे. हा शिलालेख सध्या पायरीजवळ आडवा लावलेला आहे. हा शिलालेख खरेतर वेगळ्या स्वतंत्र जागेवर ठेवून जतन करणे गरजेचे आहे.

About Alisa Noory

खोकरी अरेबिक शिलालेख –

मुरुड जंजिरा किल्ल्यासमोर जमिनीवर राजपुरीच्या पूर्वेस असलेल्या खारशेत या ओसाड गावाजवळ पुरवू खोकरी नावाचे खेडे होते. येथे इंडो-सारसेनिक पद्धतीची मोठ्या दगडातील दर्ग्यासारखी वास्तू आहे. तिच्यात सिद्धी सिरुरचे थडगे आहे.येथे याकूतखानाच्या कबरीजवळ तसेच खैरीयत खानाच्या कबरीजवळ अशा दोन अरेबिक भाषेतील शिलालेख सापडतात.

खोकरी

About Alisa Noory

कुडे मांदाड लेण्यांतील शिलालेख –

मुरुडच्या पुढे २५-२७ किमी अंतरावर कुडे मांदाड येथे बौद्धकालीन २६ शैलकृत लेणी आहेत. येथे जवळजवळ ३१ शिलालेख सापडतात. हे उच्च प्रतीच्या पुरलिपीतील शिलालेख आहेत. काही लेख प्राकृत ब्राम्ही लिपीतील आहेत येथे काही शिलालेखामध्ये मांदाड बंदरातूल दान करणारे निघाल्याचा उल्लेख सापडतो. या शिलालेखांमध्ये वर्ष व तिथीचा उल्लेख सापडत नाही. परंतु पुरलिपी वैशिष्ट्यानुसार हे लेख साधारणतः इ. स. १८० ते २५० च्या कालावधीतील असावेत.

कुडे मांदाड लेणी
  • 445
  • Historical
  • Comments Off on इतिहासाचे मुकसाक्षीदार

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password