Search
Sign In

गोकुळाष्टमी

गोकुळाष्टमी

अलिबाग मधील लोक इतर कोकण वासियां प्रमाणे उत्सव प्रिय व धार्मिक आहेत. इतर सण उत्सवा प्रमाणे गावातल्या मंदिरात गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. भजने रंगतात, कृष्ण जन्म कथा सांगितली जाते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा केला जातो. पाळणा, पारंपारिक गवळणी, गाणी गायली जातात आणि जन्माष्टमीचा प्रसाद सर्वाना दिला जातो. काही गावात ७ दिवस आधी पासूनच सप्ताह साजरा होतो व आठव्या दिवशी श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा होतो.

जन्माष्टमीचा दुसरा दिवस गोपाळकाला. काला म्हणजे दही, दुध, लोणी, पोहे, खोबरे, साखर असे अनेक पदार्थ एकत्र करून केलेला प्रसाद, म्हणून याला दहीकाला ही म्हणतात. श्रीकृष्णाने वृंदावनात सर्व बाल गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्यातल्या सर्व पदार्थांचा काला केला होता, याच गोष्टी वरून गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची व दही हंडी फोडण्याची प्रथा पडली आहे. श्रीकृष्णाची कृती म्हणजे समाजातील भेदभाव, श्रेष्ठ कनिष्ठता सारख्या अनिष्ठ प्रथांना छेद देऊन समानतेचा संदेश देणारी आहे.

कोकणात दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.सर्व तरुण मंडळी एकत्र येतात आणि घरोघरी जाऊन “गोविंदा आला रे आला” अशी गाणी गात, भिजण्यासाठी पाणी मागतात. नंतर हे पथक देवळासमोर जमतात आणि थरांवर थर लावून उंचावर बांधलेली दही हंडी फोडतात. हल्ली गावातल्या चौकाचौकात सार्वजनिक दहीहंडी लावल्या जातात व त्या फोडण्या साठी स्पर्धा, बक्षिसे जाहीर केली जातात. एकएक गोविंदा पथक येऊन रिंगण करून, मनोरे रचून ही दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न करतात त्याच वेळी गावातली माणसे, महिला व मुली या गोविंदा पथकाच्या अंगावर पाणी उडवतात. दहीहंडी फोडण्यात यशस्वी झालेले पथक बक्षिसाचे मानकरी ठरते. अशी दही हंडी चौका चौकात लावली जाते आणि उत्साही तरूण मंडळी ती दहीहंडी फोडून आनंद साजरा करतात.

कुर्डुस येथील दहीहंडी – 

अलिबाग मधील “कुर्डूस” या गावातील आगरी-कोळी बांधव वेगळ्या प्रकारे दडीहंडी उत्सव साजरा करतात. या गावातली तरूण मंडळी एकत्र येऊन विहिरीच्या वर मधोमध उंच दहीहंडी टांगतात. नंतर पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत काठावरून उंच उड्या मारून तरुण दही हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात.

यात चढाओढ लागते. तरुण मुले एकावर एक थर रचून एकत्र विहिरीत उंच उडी मारतात व हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. हंडी फोडण्यात यशस्वी झालेल्या गटाला गावकरी बक्षीस देतात. ही दहीहंडी फोडण्याची कला बघण्या सारखी असते. बघणारे सर्व गावकरी हंडी फोडायचा प्रयत्न करीत असलेल्या तरुणांना प्रोत्साहन देत असतात. ढोल ताशा पारंपारिक पद्धतीने वाजवून त्यांचा उत्साह वाढवत असतात. या अनोख्या खेळात सर्व गावकरी सहभागी होतात.

  • 913
  • Festivals
  • Comments Off on गोकुळाष्टमी

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password