Search
Sign In

Bene Israeli Jews of Alibag

Bene Israeli Jews of Alibag

अलिबाग परिसरामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये इतिहासात साधारणतः १९ वेगवेगळ्या राजवटींनी राज्य केले. या राजवटींपैकी काही भारतातील तर काही परदेशी सुद्धा होत्या. या राजवटींशिवाय इतरही काही परदेशी नागरिक येथे वास्तव्यास आले. त्यातील एक महत्वाचे म्हणजे ज्यू अर्थात बेने इस्रायली.

अलिबाग आणि ज्यू अर्थात बेने इस्रायल यांचे एक अतूट नाते आहे. अलिबाग नावातच याचा पुरावा सापडतो. एलिशा/ एलिझा या नावाच्या एका ज्यू माणसाच्या सध्याच्या अलिबाग परिसरात स्वतःच्या मालकीच्या बागा होत्या. बागा म्हणजे नारळी पोफळीच्या वाड्या आणि शेतजमीन होत्या. या एलिया, अलीच्या बागा म्हणून अलिबाग हे नाव हळूहळू प्रचलीत झाले. या भागात अगदी प्राचीन काळापासून कोळी आणि इतर समाजातील लोकांची वस्ती होतीच, पण त्यांच्याबरोबर हे ज्यू लोकही वास्तव्य करुन राहु लागले.

आपल्याला त्यामूळे खुप आश्चर्य वाटेल की मग ज्यू लोकांचा आणि अलिबागचा संबंध कसा झाला असेल? त्यासाठी आपल्याला थोड्या प्राचीन इतिहासाकडे म्हणजेच भूतकाळात डोकवावे लागेल.

इतिहास –

भारतीय ज्यू इतिहासकार एस्थर डेव्हिड आणि इतर अभ्यासक आणि स्थानीक ज्यू लोकांच्या तोंडातून हा इतिहास सांगितला जातो. यांच्या म्हणण्याप्रमाणे २००० वर्षांपूर्वी रोमन साम्राज्याच्या छळातून सुटून ज्यू या प्रदेशात आले. येरुसलेम/ जेरुसलेम येथील मूळचे ज्यू लोकं तेथुन अनेक बोटीतून जगाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचले. यातील काही जहाजे भारतात आली काही केरळ कडे गेली तर काही अलिबाग परिसरातील नवगाव या गावाच्या किनाऱ्याला अपघात होऊन फुटली. यातील सात जोडपी वाचली आणि यांचेच वंशज आज या परिसरात राहतात. पुढे अलिबाग आणि परिसरातील अनेक गावात या समाजाचे वास्तव्य वाढत गेले. या लोकांनी येथे शेतामध्ये काम करणे आणि तेल गाळण्याचा व्यवसाय स्वीकारला. शनिवारी त्यांचा विश्रांतीचा दिवस असल्याने यांना शनिवार तेली असेहि संबोधले जाऊ लागले.

या समाजाने स्थानिक लोकांनी उत्तम रीतीने जुळवून घेतले. त्यांनी स्थानिकांच्या अनेक चालीरीती स्वीकारल्या आणि भारतीय समाजात मिसळून गेले. भारत हा एकमेव देश होता जेथे त्यांना कोणताही त्रास झाला नाही. यांनी येथील खाद्यपदार्थ, वेशभूषा स्वीकारली. याची आडनावे सुध्दा वैशिषटयपूर्ण आहेत. ते आपल्या नावामागे ज्या गावात त्यांचे वास्तव्य होते त्याचे नाव लावतात. उदाहरणार्थ पेणकर, अवास कर, तळकर, झिरडकर, नागावकर इ.  ज्यू इस्रायल मधून येथे आले आणि त्यांची हिब्रू भाषा हळू हळू विसरू लागले, पण त्यांनी त्यांचे शब्बात श्लोम विसरले नाही. अलिबाग, रेवदंडा आणि इतर ठिकाणी या समाजाची प्रार्थना स्थळे आजही आहेत. ज्याला ते मशीद अथवा synagogue म्हणतात. तसेच त्यांच्या दफनभूमी/ cemetery आहेत, अशीच एक दफनभूमी अलिबागजवळील नवगाव या गावात आहे.

अलिबाग कोळीवाड्यातील सिनॅगॉग –

अलिबाग मध्ये इस्रायल आळी जवळ हे ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ – मागें अबोथ सिनॅगॉग आहे. हे सिनॅगॉग १९१० साली Mr. Moses Samual Vakrulkar यांच्या देखरेखीखाली बांधण्यात आले.

एलीयाहू हन्नबी रॉक –

अलिबाग जवळील खंडाळा गावाजवळ एलीयाहू हन्नबी या देवदूताच्या घोड्याच्या टापांचा आणि रथातून गेल्याचा पुरावा दाखवला जातो. येथे एका खोलगट जागेजवळ एक मोठाला कातळ आहे व त्यावर एक मोठी रेषा दिसून येते. हि रेषा याच घोड्याच्या टापामुळे बनल्याचे मानले जाते. याबद्दलही अशाच काही गोष्टी आणि दंतकथा सांगितल्या जातात. हे स्थान ज्यू लोकांसाठी फार पवित्र स्थान आहे. व येथे भेट देण्यासाठी दरवर्षी भारतभरातून तसेच इस्रायल मधून सुद्धा बऱ्याच प्रमाणात येत असतात.

येथील ज्यू समाजातील अनेक जण आता त्यांच्या देशात वास्तव्याला गेले आहेत, त्यामूळे येथील संख्या बरीच कमी झाली आहे. मात्र अनेक इस्रायली लोकं आजही येथे त्यांच्या पूर्वजांच्या वास्तव्याच्या खुणा बघण्यासाठी येतात. अनेक इतिहास अभ्यासक आणि पर्यटकही या स्थळांना आणि स्थानिक लोकांना भेटण्यासाठी येत असतात. अलिबागमध्ये तर इस्रायल आळी सुद्धा आहे, येथे बरीच ज्यू कुटुंबे राहत असत. पण आता हि कुटुंबे कमी झाली आहेत.

संदर्भ, माहिती संकलन, भ्रमंती –
संगीता कळसकर – भारतीय प्राच्य विद्या अभ्यासक , श्री सुनील प्रधान व अलिबाग ऑनलाईन टीम 

  • 46
  • Historical
  • Comments Off on Bene Israeli Jews of Alibag

Tags

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password