Search
Sign In

आफ्रिकन बाओबाब – गोरखचिंच

आफ्रिकन बाओबाब – गोरखचिंच

हजारो वर्षे आयुष्य असणारा भारतातील दुर्मिळ वृक्ष म्हणजे गोरखचिंच, म्हणजेच African Baobab. मूळचा आफ्रिका खंडात, मादागास्कर, तसेच ऑस्ट्रेलिया येथे सापडणारा हा वृक्ष भारतात साधारणतः २५० ते ३०० वर्षांपूर्वी आला असावा असा अंदाज. भारताप्रमाणे हा वृक्ष इतर देशांमध्ये सुद्धा विस्तारित झाला. ह्या झाडाचा प्रसार काही ठिकाणी समुद्रमार्गे झाला असावा तर काही ठिकाणी स्थलांतरित झालेल्या माणसांकडून झाला असावा. गोरख चिंचेला महाराष्ट्रामध्ये चोरचिंच, तर इतर देशांमध्ये मंकी ब्रेडट्री असे देखील म्हणतात. ह्या प्रकारच्या काही झाडांचा आकार हा उलट्या झाडासारखा म्हणजे मुळाचा संभार वरच्या बाजूला तर खोड खालच्या बाजूला असा दिसत असल्याने ह्या झाडाला  काही ठिकाणी इंग्रजीमध्ये ‘अपसाईड डाऊन ट्री ‘ असेही म्हणतात.

मूळचा आफ्रिकेतला हा महाकाय वृक्ष शेकडो वर्षांपुर्वी भरतभुमीवर आणला गेला. अडॅनसोनिआ  डिजिटाटा (Adansonia digitata) असं शास्त्रिय असलेला हा महाकाय  वृक्ष परदेशी असला तरिही आपल्याकडच्या मालवेसी कुळाचा [ Malvaceae ] सदस्य समजला जातो. याची उंची साधारणतः ५० फूट तर खोडाचा परीघ १०० फुटापर्यंत असू शकतो. अशा या महाकाय वृक्षाच्या खोडामध्ये हजारो लिटर्स पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते, आणि हेच ह्या झाडाचे मोठे वैशिष्ट्य आहे. आफ्रिकेतील ओसाड प्रदेशामध्ये स्वतः तग धरून तसेच इतर जीवांच्या सुद्धा उपयोगी हे झाड येते. या वृक्षाच्या खोडातील ढोलीचा उपयोग आफ्रिकेमध्ये राहण्यासाठीसुद्धा केला जातो. या वृक्षाचे आयुष्य १००० वर्षांपर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते.

या वृक्षाची फुले ५ पाकळ्यांची असून लांब देठ असते, व हि फुले रात्री फुलतात. यांचा मंद सुवास परिसरात दरवळतो. फुले गळून गेल्यावर याला बाटलीच्या आकाराची साधारणतः १ फूट लांबीची फळे येतात. गोरखचिंचेच्या फळातील गराची चव फिकट मधुर आणि किंचित कडू असते. या फ़ळात मोठ्या प्रमाणात अमिनोआम्ल, मिनरल्स, क्यल्शियम्स, व्हिटामिन सी आढळतात. गोरखचिंचेच्या पानांत ‘क’ जीवनसत्त्व, शर्करा, पोटॅशिअम व टार्टरेट असते. याच्या फळामध्ये सुद्धा अनेकविध औषधी गुणधर्म आढळून येतात. उन्हाळ्यामध्ये इतर सरबतांपेक्षा गोरखचिंचेचे सरबत शीतल आणि दाहनाशक असते. या वृक्षाचे लाकूड मऊ पण टिकाऊ असल्यामुळे याचा उपयोग सुद्धा बऱ्याच ठिकाणी केला जातो. ह्या झाडाच्या जवळजवळ सर्वच भागांचा उपयोग माणसांकडून केला जातो.

बाओबाबच्या नऊ जाती अस्तित्वात असून जगभर नेल्या गेल्या आहेत. भारतामध्ये याच्या काही जाती आढळतात. अलिबाग आणि परिसरामध्ये काही ठिकाणी हे वृक्ष आजही दिसून येतात.  चौल येथील भोवाळे येथे डोंगरावरील श्री दत्तमंदिराकडे जाण्याच्या मार्गावर गोरखचिंच दिसून येतो. अलिबागमध्ये रामनाथ येथील श्री राम मंदिराच्या मागच्या बाजूस एक वृक्ष दिसतो, रेवदंड्याकडून मुरुड ला जाताना कोर्लई येथे रस्त्याच्या बाजूला एक वृक्ष दिसतो. तसेच चौल येथील हिंगुलजा मंदिरावर जाताना डाव्या बाजूस भला मोठा गोरखचिंच वृक्ष दिसतो. भारतामध्ये जसे नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्षाची उपमा देतो तसेच आफ्रिकेमध्ये ह्या झाडाला कल्पवृक्षासमान मानतात.

  • 896
  • Natural Wonders
  • Comments Off on आफ्रिकन बाओबाब – गोरखचिंच

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password