Search
Sign In

आग्रावची शिडाच्या होड्यांची शर्यत

आग्रावची शिडाच्या होड्यांची शर्यत

अलिबाग परिसरामध्ये कित्येक वर्षांची परंपरा जपणाऱ्या आणि संस्कृतीची ओळख असणाऱ्या बऱ्याच गोष्टी अजूनही पाहायला अनुभवायला मिळतात. त्यातीलच एक म्हणजे चैत्र महिन्यात गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी भरणारी आग्राव येथील शिडाच्या होड्यांची शर्यत.

अलिबागपासून साधारणतः २० किमी अंतरावर असलेले आग्राव हे गाव. आणि इथली खासियत म्हणजे येथील खाडीतील अनोखी अशी शिडाच्या होड्यांची शर्यत. गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी हि शर्यत भरवली जाते. रेवदंडा आणि आग्राव च्या मध्ये जी खाडी आहे त्यामध्ये हि शर्यत होते. आग्राव येथे मोठ्या प्रमाणात असलेला कोळी समाज आणि त्यांची श्रद्धा असलेली एकवीरा देवी. या देवीच्या मानाची पालखी सुद्धा या दिवशी होडीतून नेली जाते. आणि पाठोपाठ शर्यतीला सुरुवात होते. हि शर्यत पाहायला फार दूरवरून लोक येतात. ही शर्यत कुंडलिका नदी जिथे समुद्राला मिळते त्या खाडीत असते. या शर्यतीला एक धार्मिक इतिहास आहे.

इतिहास – कोणे एके काळी, म्हणजे साधारणतः शंभर वर्षांपूर्वी कोर्लई, रेवदंडा, चौल आणि आग्राव या गावातील एकवीरा देवीची पालखी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी घाटावरील कार्ला येथील एकवीरेला भेटायला, पायी यात्रा करत घेऊन जात असत. पायी यात्रेकरूंना मदत म्हणून शिडाच्या नौकेने, गावकरी रोह्याजवळच्या झोळांबे गावी नेऊन त्यांना सोडत असत. मुंबई-गोवा हायवे तेव्हा नव्हताच! परतीच्या वाटेवर असताना या शिडाच्या नौका गंमत म्हणून आपसात शर्यत लावू लागल्या. नंतर रस्ते झाले, आणि पायी यात्रा हळुहळू नाहीशी झाली, पण शिडाच्या नौकांची शर्यत मात्र टिकून आहे. पाडव्याच्या आधी दोन आठवड्यापासून या चारही गावातल्या आठ नौका दुरुस्त करून, तेलपाणी करून सजविल्या जातात. एक सिनियर आणि एक ज्युनियर अश्या प्रत्येक गावातून दोन बोटी स्पर्धेत उतरतात. आग्राव ते कुडे आणि मग परत येऊन साळावच्या पुलाला वळसा घालून, पुन्हा आग्राव जेटी अशी शर्यत असते. शंभर वर्षांहूनही अधिक जुनी अशी ही परंपरा आणि त्यासोबत चालणारा उत्सव हे स्थानिक कोळी बांधवांच्या जिवाभावाचं आहे.

 

या शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी आजूबाजूच्या गावातील कोळी बांधव त्यांच्या शिडाच्या होड्या पाण्यात उतरवितात. या होड्यांची नावे सुद्धा साजेशी असतात. एकवीरा देवीची पालखी निघाली कि नंतर शर्यतीला सुरुवात होते ती एका मोठ्या आवाजाच्या फटाक्याने. नंतर सर्व होड्यांचे शीड उघडले जाते व शर्यतीला सुरुवात होते. या शर्यतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या होड्यांना इंजिन नसते व या पूर्णपणे वाऱ्यावर चालतात. यामध्ये महत्वाचा असतो वारा, वाऱ्याचा वेग आणि शिडाची त्या वाऱ्यासोबत करण्यात येणारे नियोजन – यावरच त्या होडीचे शर्यतीतील भवितव्य असते. यामध्ये महत्वाची भूमिका असते ती म्हणजे या होडीचे तांडेल आणि खलाशी यांची. या सर्वांचे कसब त्या जोडीला जिंकून देते. ठराविक अंतर पार केल्यानंतर या होड्या उलट दिशेनं परत फिरतात. या वळणावर सर्वांचे खरे कसब पणाला लागते, वाऱ्याचा अंदाज घेत होडी उलट दिशेनं फिरवणे आणि त्याचबरोबर होडीतील पाणी बाहेर काढणे हे जिकिरीचे काम असते. या शर्यतीदरम्यान कधी कधी होडी उलटण्याची सुद्धा संभव असतो तर कधी कधी होडी वाचविण्यासाठी खलाशी स्वतःहून पाण्यात उड्या मारतात . अशी हि मजेशीर शर्यत पाहायला अगदी मुंबई पुण्याहून लोक येतात.

आपली alibagonline ची टीम सुद्धा हि शर्यत पाहायला ह्यावर्षी गेली होती. हे वातावरण म्हणजे आपल्याकडील गणपती उत्सवा इतकं जल्लोष असलेले होते. आठ होड्यांची शर्यत बघायला, आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला अंदाजे दोन अडीचशे बोटी आणि प्रत्येक बोटीवर तिच्या आकारानुसार 25 ते 100 लोक इतका जनसमुदाय कुंडलिका नदीत जमला होता. गंमत म्हणजे कुठल्याही दोन बोटी एकमेकांच्या जवळ आल्या की एकमेकांना खाद्यपदार्थ व पेयांची देवाणघेवाण होते. कधी कधी एका बोटीवरचे लोक दुसऱ्या बोटीवर नाचगाणी करायला जातात.

अशी हि अलिबाग आणि आग्राव ची शान असलेली शिडाच्या होड्यांची पारंपरिक, मजेशीर, शर्यतीचा आनंद अलिबाग मध्ये घ्यायला नक्की भेट द्या गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी …

  • 1022
  • Festivals
  • Comments Off on आग्रावची शिडाच्या होड्यांची शर्यत

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password