अलिबागमधील हे अजून एक १७ व्या शतकातील पुरातन मंदिर.
इतिहास –
कै राघोजीराजे आंग्रे यांच्या पत्नी श्रीमंत नर्मदाबाई आंग्रे यांनी ह्या मंदिराच्या मूर्तीची स्थापना दि २४ फेब्रुवारी १७७९ रोजी केली. ह्या पहिल्या मूर्तींची झीज झाल्यामुळे नवीन मूर्तींची स्थापना दि १५ ऑक्टोबर २००७ रोजी केली गेली. मंदिरातील घंटेवर या तारखेचा संदर्भ आढळतो. नवीन मूर्ती हि गंडकी पाषाणात घडवलेली २ फूट ९ इंच एवढी आहे . मस्तकावर शिवलिंग कानात मकर कुंडले आहेत. छातीवर भृगऋषी नी मारलेल्या तेथेचि खूण असून उजव्या हातात कमळाची कळी व कमरेला व्यासनीच्या वेलाचा करदोडा आहे. पायामधे गोकुळात गायी राखण्यासाठी घेतलेली काठी असून डाव्या पायावर कान्होपात्रा दासीचे गर्वहरण करताना तिच्या नखांची असलेली खूण आहे. डाव्या बाजूला श्री रखुमाई माता आहे . गाभार्याच्या बाहेरच्या बाजूस एका मोठ्या सभागृहामध्ये शेज गृह व पालखी गृह आहे. याच ठिकाणी एक गरुड खांब आहे याला आलिंगन दिल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. मधोमध एक रंगशीळा आहे.
मंदिराचे सभामंडप पूर्वी लाकडी व कौलारू होता, अलीकडेच हा सभामंडप नव्याने बांधण्यात आहे आहे. मंदिराचे व्यवस्थापन श्री क्षेत्र विठोबा देवस्थान वरसोली मार्फत केले जाते.
मंदिर परिसर-
मंदिराच्या समोरच श्री गरुड मंदिर आहे. मंदिराच्या सभोवताली श्री क्षेत्र विठोबा देवस्थान वरसोली मार्फत वृक्ष लागवड केलेली आहे, यामध्ये नवग्रहांचे वृक्ष, पंचवटी वाटिका वृक्ष, १२ राशींचे वृक्ष, नक्षत्रांचे आराध्य वृक्ष, गणपतीला पूजेसाठी लागणाऱ्या २१ पत्रीच्या वनस्पती अशा विविध प्रकारच्या दुर्मिळ तसेच धार्मिक व वैद्यकीय दृष्ट्या महत्वाच्या झाडांची लागवड केली आहे .
येथील स्थानिक व्यापारास चालना मिळावी म्हणून दर एकादशीला येथे बाजार भरतो. तसेच वर्षातून एकदा येथे खूप मोठी यात्रा सुद्धा भरते.
असे हे इतिहासाची साक्ष देणारे मंदिर नक्की पहा
कसे पोहोचाल –
वरसोली हे अलिबाग ला लागूनच असलेले ऐतिहासिक गाव. वरसोली गावामध्येच हे मंदिर स्थित आहे
- अलिबाग वरसोली अंतर १.५ किमी
- अलिबाग पुणे : १४५ किमी
- अलिबाग मुंबई :१२० किमी
जवळचे आकर्षण –
- वरसोली समुद्रकिनारा (१.५ किमी )
- रामनाथ राम मंदिर ( १ किमी )
- अलिबाग समुद्रकिनारा (२ किमी )
Amenities
- Bike Parking
- Car Parking