कोकण किनारपट्टीचाच एक भाग असलेल्या रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हे अजून एक सुंदर ठिकाण. अलिबाग ते मुरुड मार्गावर नांदगाव नावाचे छोटेखानी गाव लागते. नांदगावमध्ये प्रवेश करताच आपले स्वागत होते ते नारळी पोफळीच्या बागांनी. दुतर्फा नारळी पोफळीच्या बागांनी वेढलेला मधोमध रस्ता. साधारणतः पाच हजार वस्तीच्या गावाच्या मधोमध असलेले हे प्रसिद्ध असे नांदगावचे सिद्धिविनायक मंदिर. निसर्गानेसुद्धा या गावावर श्री गणेशाप्रमाणेच वरदहस्त ठेवलेला आढळतो. सिद्दीच्या काळात किनाऱ्यावरील ते प्रमुख व्यापारी बंदर होते. आज नांदगाव प्रसिद्ध आहे ते श्री सिद्धिविनायक क्षेत्र म्हणून. भक्तगणांची मनोकामना पूर्ण करतो तो सिद्धिविनायक. भगवान विष्णूंनी सुद्धा या गणेशाची आराधना केल्याचा संदर्भ सापडतो. लग्नातील मंगलाष्टकांमध्ये स्थान असलेला हा सिद्धिविनायक.
उत्कृष्ठ नक्षीकाम केलेला मंदिराचा कळस दुरूनही नजरेस भरतो. त्यावर इंद्र, ईशान्य, अग्नी, यम, नैऋत्य, वरुण, वायू, कुबेर अशा अष्टदिक्पालांच्या मूर्ती कोरल्या आहेत. मंदिराचे प्रेवशद्वार तसे साधे असले तरी सभामंडप मात्र प्रशस्त व नक्षीकाम केलेला आहे. स्वयंभू आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असली तरी त्याचे मूळ स्थान कोणते याबद्दल एकमत नाही. याबद्दल काही आख्यायिका सुद्धा आहेत. त्यानुसार मंदिराचे बांधकाम इ. स. १०३६ मध्ये झाले. त्यापूर्वी हि गणेशमूर्ती गावाच्या उत्तरेला असलेल्या केतकीच्या बनातून एका भक्ताने गणेशाने दिलेल्या दृष्टान्तानुसार आपल्या घरी आणली. कालांतराने तेथेच लहानसे मंदिर बांधण्यात आले.
पूर्वी असलेल्या कौलारू मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी १९५६ मध्ये नांदगाव मुरुड व मुंबई येथील गणेशभक्तांनी पुढाकार घेऊन समिती स्थापन केली. सर्वांच्या मेहनतीस फळ येऊन १९८३ साली जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले. पूर्वी मंदिरास कळस नव्हता. आता मात्र तीस फूट उंचीचा कळस बसवून त्यावर अष्टदिक्पाल मूर्ती बसविण्यात आल्या. मंदिरामध्ये संगमरवरी फरशी बसवली गेली. १९६६ नंतर पुजारी ट्रस्ट, उत्सव ट्रस्ट , जीर्णोद्धार ट्रस्ट, दिवाबत्ती ट्रस्ट असे ट्रस्ट निर्माण करून कार्यविभागणी झाली.
उत्सव –
प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला येथे भाविक बऱ्याच प्रमाणात दर्शनाला येतात. यावेळी मंदिरात भजन कीर्तन आयोजित केले जाते.गणेश जयंतीचा येथे मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. गणेश जयंतीला येथे यात्रा भरते व भजन कीर्तन सुद्धा उत्साहात केले जाते.
सर्वपरिचित अशी अष्टविनायकाची यात्रा झाली कि भाविक येथे येतात ती यात्रेची सांगता करायला. अलिबाग हुन मुरुडला जाणारे बरेच भाविक येथे मुद्धाम दर्शनाला थांबतात, व नंतर पुढचा प्रवास करतात.
“रिद्धी सिद्धीचा नायक तू सुखदायक तू भक्तांसी” असे ज्याचे वर्णन केले जाते अशा श्री सिद्धिविनायकाचे दर्शन अलिबाग भेटीमध्ये नक्की घ्या !