अलिबागजवळील आक्षी हे आंग्रेकालीन अष्टागरांतील महत्वाचे ठिकाण. याच आक्षी मध्ये मराठीमधील आद्य शिलालेख आहे. आणि जवळच पुरातन असे श्री सोमेश्वराचे मंदिर आहे. आक्षी गावामध्ये गेल्यावर ज्या ठिकाणी शिलालेख सापडले त्याच ठिकाणच्या चौकाजवळ हे मंदिर आहे. अलीकडच्या काळामध्ये ह्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे.
मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर अतिशय सुबक नक्षीकाम केलेल्या लाकडी खांबांवर उभा असलेला सभामंडप नजरेस पडतो. या लाकडी खांबांवरचे नक्षीकाम पाहताना नजर हटत नाही. काही खांबांवर देवदेवतांची चित्रे कोरली आहेत. सभामंडपाचे छत पूर्वी कौलारू होते, पण आता त्याचे नूतनीकरण केले आहे. सभामंडपानंतर श्री सोमेश्वराच्या गाभारा दिसतो, गाभाऱ्यावर नक्षीदार घुमट आहे.
मंदिरासमोरच एक मोठ्या आकाराचा दीपस्तंभ उभा आहे. मंदिराभोवताली अलीकडेच सुशोभीकरण केले आहे.
ऐतिहासिक ठेवा –
हे मंदिर जसे पुरातन इतिहासाचा वारसा सांगते, तसेच मंदिराजवळच कोकण शिलाहारवंशीय नृपती केशिदेवरायाचा आणि देवगिरी यादव नृपती रामचंद्रदेव यांचा असे दोन शिलालेख सापडले आहेत. ते आता जवळच समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक स्थापन केले आहेत. मंदिराजवळ अजून एक पुरातन चिंताहरेश्वराचे शिवमंदिर आहे, त्यासमोर एक जुनी बारव (पायऱ्यांची विहीर) सुद्धा आहे.