चौल रेवदंडा जोडरस्त्याला लागून असलेले हे अजून एक पुरातन शिवमंदिर. मंदिरासमोर भव्य पटांगण, व एका बाजूला असलेले हे कौलारू छोटेखानी मंदिर. बाहेरून एखाद्या घरासारखे दिसणारे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर प्रथम दर्शनी येतो तो छोटासा लाकडी सभामंडप. सभामंडपाच्या लाकडी खांबांवर थोड्याफार प्रमाणात नक्षीकाम दिसून येते. मंदिराच्या भिंती साधारणतः २ फूट जाडीच्या आहेत. सभामंडपामध्ये समोरच स्थानापन्न झालेला नंदी दिसतो, नंतर मल्लेश्वराचा गाभारा दिसतो व आत मध्ये शिवपिंडी. गाभारा दगडी बांधकामाचा असून त्यावर अलीकडेच टाईल्स बसवल्या आहेत. गाभार्यामधील शिवपिंडी मागे पार्वती देवीची मूर्तीसुद्धा दिसते.
मंदिरासमोरच दोन माध्यम आकाराचे दीपस्तंभ आहेत. व त्याला आता सिमेंट चे आच्छादन केलेले दिसते. मंदिराच्या डाव्या बाजूस काही पुरातन मूर्ती व शिवपिंडी अजूनही ठेवलेल्या आहेत. या कदाचित पुरातन मंदिरामधील असाव्यात.
मंदिरासमोर एका बाजूला एका मोठ्या पिंपळवृक्षाला लागून येथे एक पुरातन पुष्करिणी अजूनही सुस्थितीत आहे. पुष्करिणीच्या चोहो बाजूने बांधकाम केलेले आहे व एका बाजूने पायऱ्या आहेत. येथील पाणी सध्या कोणी वापरात नसावे असे दिसून येते.