Mahalakshmi Temple – Bagmala, Chaul - Hosted By alibagonline
बागमळा येथील पेट्रोल पम्पाच्या पुढे डावीकडे असलेल्या कमानीतून आत गेले कि साधारणतः १ ते २ किमी गेल्यावर श्री महालक्ष्मी चे पुरातन मंदिर एका छोट्या टेकडीवर दिसून येते. डोंगराच्या पायथ्याशी अजून एक कमान आपले स्वागत करते आणि नंतर दगडी पायऱ्या सुरु होतात. शंभर एक पायऱ्या चढून गेले कि एक घुमटाकार मंदिर दिसून येते. हि आहे मंदिराची मागची बाजू. या बाजूच्या विरुद्ध बाजूस मंदिराचे प्रवेशद्वार आहे. बाहेरून मंदिर पाहताना दोन घुमट दिसतात, पैकी पहिले घुमट म्हणजे सभामंडप तर आतील घुमटाखाली श्री महालक्ष्मी चा गाभारा आणि त्यावर छोटेसे घुमट.
सभामंडपाचे नक्षीकामावर चौल येथील इतर बऱ्याच जुन्या बांधकामाची छाप पडल्यासारखी वाटते. दीड ते दोन फूट जाडीच्या भिंतींवर जाड चुन्याचा थर देण्यात आला आहे. गाभार्याला आतून नव्याने टाईल्स बसविल्या आहेत आणि एका चौथऱ्यावर महालक्ष्मी ची मूर्ती. मंदिर दगडी असल्याने उन्हाळ्यामध्येसुद्धा आतून थंडगार असते. मंदिराच्या डाव्या बाजूला जुने तुळशी वृंदावन आहे, तर डावीकडे एक दीपस्तंभ आहे, या दिपस्तंभावर मारुतीचे शिल्प कोरलेलं दिसते.
पुरातन शिल्पे –
मंदिरासमोरील उताराच्या जागेमध्ये साधारणतः पाच जुनी वृंदावने ओळीने ठेवलेली दिसतात, व जवळच अर्धवट भग्न झालेली श्री गणेशाची मूर्ती दिसून येते. पूर्वीच्या काळी सतीशिळेप्रमाणेच सतीच्या आठवणी म्हणून अश्या प्रकारची वृंदावने घडवत असत. त्यातीलच हि वृंदावने असावीत.
हे मंदिर टेकडीच्या खालून पहिले तर एखाद्या घुमटाप्रमाणे दिसते परंतु आतमध्ये गाभारा व मंदिराचा छोटासा नक्षीदार घुमट दिसून येतो. कदाचित परकीय आक्रमणांपासून देवी देवतांचे रक्षण व्हावे म्हणून कदाचित अशी रचना असावी.
उत्सव –
नवरात्रीमध्ये येथील भाविक, देवीचा मोठा उत्सव साजरा करतात.