आवास
अलिबागजवळ सासवणे हे समुद्रकिनारी वसलेले गाव आहे. सासवणे गावाची ओळख म्हणजे इथला सुंदर समुद्र आणि नानासाहेब करमरकर शिल्पालय. भारत सरकार तर्फे अनेक पुरस्काराने सन्मानित असे नानासाहेब यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ख्याती पसरलेली. अलिबाग-मांडवा रस्त्यावर आवास फाट्यापासुन साधारण तीन किमी अंतरावर करमरकर शिल्पालय आहे. त्यांच्या राहत्या घरीच हे शिल्पालय उभे आहे.
जीवनपट
घरात सुख शांती व कलेला पोषक वातावरण असल्याने करमरकर यांना लहानपणापासूनच लहान लहान जनावरे, खेळणी, लहान गणपती व इतर देवतांच्या मूर्ती बनवण्याचा छंद जडला. हळूहळू भिंतीवर मोठी मोठी चित्रे रंगवू लागले. स न १९१० साली अलिबागचे कलेक्टर ऑटो रॉथफील्ड यांना त्यांनी एका मंदिरात काढलेले शिवाजी महाराजांचे चित्र पहिले व त्यांची भाग्यरेषाच पालटली. पुढे रॉथफील्ड यांनी करमरकर यांना मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये शिष्यवृत्ती देऊन दाखल केले. येथे ते पहिले आले आणि त्यांना “लॉर्ड मेओ” हे पदक मिळाले. नंतर त्यांची भेट गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्याशी झाली व ते कलकत्याला गेले. नंतर त्यांना १९२० साली टाटा कंपनीने लंडन ला “रॉयल अकॅडमी” येथे पुढील शिक्षणासाठी पाठवले. नंतर ते इटली, फ्रान्स, स्वित्झर्लंड येथील कलाकारांना भेटले. नंतर भारतात परत येऊन कलकत्यामध्ये एका प्रदर्शनात “शंखध्वनी” नावाचा पुतळा ठेवला. यासाठी त्यांना खूप बक्षिसे व नाव सुद्धा मिळाले आणि कोल्हापूरचे राजेसाहेब शाहूमहाराज यांनी अश्वारूढ शिवाजीमहाराज यांचा पुतळा बनवण्याची कामगिरी सोपविली.
हिंदुस्थानातील बऱ्याच संस्थानिकांनी त्यांच्याकडून अनेक पुतळे व चेहऱ्याची मुद्रा असलेली नाणी बनवून घेतली. ग्वाल्हेर सरकारने दिवंगत राजेसाबांची संगमरवरी शिल्पे करवून घेऊन प्रसिद्ध “शिंदे छत्री” या भव्य स्मारकात या शिल्पाकृती ठेवल्या आहेत. पुढे स न १९४७ मध्ये अमेरिकेत जाऊनही खूप काम केले. भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी विठ्ठलभाई पटेल, सर जस्टीस दिनशा मुल्ला, रवींद्रनाथ, एअर मार्शल मुखर्जी, सर विश्वेश्वरया, शेर्पा तेनसिंग, बॅरिस्टर जयकर, न. चि. केळकर, आचार्य कृपलानी, लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, सर कावसजी जहांगीर, यांचे पुतळे बनवून ते जहांगीर आर्ट सोसायटी मध्ये बसवले.
या सर्व कामांसोबत ते स्वतःच्या मनोरंजनासाठी सुद्धा शिल्पे बनवत. त्यापैकी त्यांनी बनवलेली म्हैस, अल्सेसियन कुत्रे, माकडी “ज्योती” , त्यांचा नोकर “मोरू ” अशा कलाकृती सासवणे येथे ठेवल्यात, सासवणे गावातील कोळी जमातीची मुलगी १९२७ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटी च्या प्रदर्शनात ठेवली व त्याला सुवर्णपदक मिळाले.
स. न. १९६२ मध्ये भारत सरकारने “पदमश्री” ‘किताब देऊन गौरव केला. स. न. १९६३ मध्ये ते “बेस्ट आर्टिस्ट ऑफ इयर” घोषित केले गेले. आणि १९६४ मध्ये दिल्लीतील ललित कला अकॅडमीने त्यांना “फेलो” पदवी देऊन गौरविले. अशा या महाराष्ट्राच्या सुपुत्रास १३ जुने १९७६ मध्ये देवाज्ञा झाली.
त्यांची बरीचशी शिल्पे त्यांच्या सासवणे येथील घरात ठेवली आहेत. येथे साधारणतः २०० शिल्पे ठेवली आहेत. प्रवेशद्वाराजवळ असलेली स्त्री आपल्या बाळास सर्वांना नमस्कार करावयास शिकवीत आहे, वरच्या मजल्यावर प्रवेश करताना एका बाजूस भवानी देवी शिवाजीमहाराजांना तलवार देत आहे, असे पॅनल आहे, ते सन १९२४ मध्ये बनवलेले आहे . दुसऱ्या बाजूस “व्याघ्री” या जातीचा आदिवासी गुजराती तरुण आहे. वरच्या मजल्यावर गेल्यावर तेथे बरीच शिल्पे त्यांच्या नावासहित ठेवलेली आहेत.
नानासाहेब शिल्पकार म्हणून जसे प्रसिद्ध होते तसे ते त्यांच्या वैयक्तिक जीवनातसुद्धा आदरणीय होते. अतिशय मायाळू व हळव्या स्वभावाचे. सासवणे येथे वडिलोपार्जित जागेवर त्यांनी दोन माजली बंगला मंधाला व मागच्या बाजूस आंब्याची वाडी. याच बंगल्यात आता शिल्पालय आहे. नानसेब खूप दानशूर सुद्धा होते, त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत देशप्रेमींना आश्रय दिला होता. देश्प्रेमासोबत वाङ्मय, संगीत, नाटके , कलाकार, लेखक, मुद्रक या सर्व क्षेत्रातील लोकांशी त्यांची मैत्री होती.
असे हे अतिशय सुंदर शिल्पालय हे अलिबागची मोठी शानच म्हणावी लागेल. आजही अनेक शिल्पकार या शिल्पालयाला आवर्जून भेट देतात. या शिवाय अलिबागची भेट अपुरीच.
संदर्भ – कै. नानासाहेब करमरकर यांच्या अल्पचरित्र या पुस्तिकेतून