रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात सुंदर समुद्रकिनारा लाभलेले आणि प्राचीन इतिहास असणारे एक गाव म्हणजे चौल. याच चौलमध्ये वाघजाई डोंगरावर वसलेली देवी आहे हिंगलाज अथवा हिंगुळजा देवी.
हिंगलाज देवीचे मूळ स्थान बलोचिस्थान येथे असून तेथील व्यापारी आणि प्रवाशांनी तिची स्थापना भारतात अनेक ठिकाणी केलेली दिसते. चौल येथे पण हिंगुळजा मातेच्या भक्तांनी हिची उपासना चालू केली असावी. आपल्या वडिलांच्या म्हणजे दक्षाच्या यज्ञात सतीचा अपमान झाल्याने तिने यज्ञाकुंडात उडी घेतली आणि ते बघून भगवान शंकर क्रोधीत झाले. तिचे शरीर घेऊन ते भ्रमंती करू लागले.त्यांना या मोहमायेतून सोडवण्यासाठी भगवान विष्णूंनी तिच्या शरीराचे तुकडे केले. ते भरतखंडात वेगवेगळ्या ठिकाणी पडले. तेथेच देवीची शक्तीपीठे तयार झाली.वेगवेगळ्या पुराणात यांची संख्या वेगवेगळी आहे. ५१,५२,७२,१०८ अशी ती संख्या सांगितली जाते. भारतात ४१, श्रीलंकेत १, बांगलादेशात ४, तिबेट मध्ये १,नेपाळ मध्ये ३,तर पाकिस्थानात १ अशी ती शक्तीपीठे पुजली जातात.
सतीचे मस्तक जेथे पडले ते स्थान बालूचीस्थानातील मकरान टेकड्यांच्या प्रदेशात आहे. हीच ती हिंगलाज माता. कराचीपासून २५० किलोमीटर वर हिची गुंफा आहे. स्थानिक हिंदू व मुस्लिम हिला नानी का मंदिर अथवा नानी कि हज म्हणतात..शेजारून हिंगोल नदी वाहते. हिच्या बरोबर योगिनी मातेचे पण स्थान आहे असे सांगितले जाते. दंतकथेनुसार हा देश पूर्वी हिंगोल देश म्हणून ओळखला जाई . तेथे राहणारे म्हणून हिंगोली लोक ओळखले जाऊ लागले. तेथील जुलमी हिंगोल राजाचा वध देवीने येथे केला असे सांगितले जाते. परशुरामाने क्षत्रियांचे अस्तित्व पृथ्वीवरून पुसायला सुरुवात केली तेव्हा काही जण हिंगलाज मातेला शरण गेले तेव्हा देवीने त्यांना ब्रह्मक्षत्रिय असे संबोधून वाचवले होते.तसेच नाथपंथीयांमध्ये सुद्धा हिची उपासना करतात.पौराणिक संदर्भ लक्षात घ्यायचा तर नवनाथ कथासार या ग्रंथात मत्स्येन्द्र नाथांनी प्रदक्षिणा केली ,तिच्यामध्ये या देवीचा उल्लेख येतो. भावसार(रंगारी) समाज,सुवर्णकार समाज,भन्साळी समाज पण हिची पूजा करतो. या देवीसोबत भैरव असतोच. याशिवाय आशापुरी देवी, अन्नपूर्णा देवी ,काली यांची पण स्थापना करतात. चौल येथे हिंगलाज देवी बरोबर भैरव आणि आशापुरी देवीचे व अन्नपूर्णा देवीचे, तसेच गणपतीचे पण देऊळ आहे.
चौल नाक्यावरून भोवाळे येथे श्री दत्त मंदिराकडे जाण्याचा जो रस्ता आहे, त्या रस्त्याने सरळ गेले कि काही अंतरावरच डाव्या बाजूच्या डोंगरावर ह्या देवीचे स्थान आहे. डोंगर पायथ्यापर्यंत गाडी जाते तर थोड्या पायऱ्या चढून आपल्याला देवीच्या मंदिर आणि लेण्यांपर्यंत जाता येते. चौल प्रमाणे भारतात इतरही ठिकाणी या देवीची उपासना चालते.जैसलमेर,कच्छ,कोल्हापूर,मुंबई,अमरावती, छिंदवाडा जयपूर अशा अनेक ठिकाणी देवीच्या भक्तांनी हिची स्थापना केलेली आहे. चौलमध्ये अशीच काही कुटुंबे स्थायिक झाली आणि त्यांनी आपले उपासना स्थान म्हणून हिंगलाज देवीची स्थापना केली असावी. ह्या डोंगरावर अनेक औषधी वनस्पती दिसून येतात. पायरी वाटेवर डावीकडे एक भले मोठे गोरखचिंचेचे सुद्धा झाड पाहायला मिळते. येथे परिसरामध्ये काही ताडाची झाडे सुद्धा आहेत.
ऐतिहासिक चौल मधील आहे हे ऐतिहासिक वारसा असलेले हिंगुलजा देवीचे मंदिर, नक्की पाहावे असे.
ऐतिहासिक संदर्भ – संगीता कळसकर (भारतीय प्राच्यविद्या अभ्यासक)