आंग्रेकालीन अष्टागरांतील एक महत्वाचे गाव म्हणजे नागाव. आजच्या आधुनिक जगात पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण. याच नागावमध्ये असलेल्या काही निवडक पुरातन मंदिरांपैकी एक म्हणजे श्री दक्षिणमुखी देवी चे मंदिर. नागाव च्या मुख्य रस्त्यालगत हे मंदिर आहे.
आजपासून ५ ते ६ पिढ्या पूर्वी म्हणजेच साधारणतः २०० ते २५० वर्षे पूर्वी यथे राहणारे चिटणीस कुटुंबीय यांना हि मूर्ती शेतामध्ये नांगरणी करताना सापडली. याच नांगराची खूण सुद्धा देवीच्या पायावर दिसून येते. चिटणीस कुटुंबीयांनी मग या देवीची स्थापना याच जागेवर पूर्वाभिमुख केली, पण देवीचे रूप दक्षिणाभिमुख बदलल्याचे दिसून आले, असे २ ते ३ वेळा घडले, त्यानंतर स्थानिक पंडितांच्या सल्ल्यानुसार या देवीची स्थापना दक्षिणाभिमुख केली, व त्याबरोबरच शेजारी श्री महालक्ष्मी देवीची पूर्वाभिमुख स्थापना केली. याच चिटणीस कुटुंबियांचे सभासद श्री अभय चिटणीस आणि श्री अजित चिटणीस हे सध्या येथील देखभाल करतात. हि देवी येथील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाची कुलदैवत आहे. या मंदिराला अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून दिवाबत्तीची लागणारी आर्थिक मदत येत असे.
श्री दक्षिणमुखी देवीच्या मंदिरामध्ये देवीची विविध रूपे पाहावयास मिळतात. सर्वात उजवीकडे श्री गणपती व श्री शंकर पार्वतीच्या मूर्ती आहेत. नंतर श्री महालक्ष्मी चे स्थान आहे. त्याच्या बाजूला श्री एकवीरा, श्री जोगेश्वरी, श्री आंबा, श्री निंबा अशा प्रकारच्या देवींची रूपे पाहावयास मिळतात. नंतर दक्षिणेला मुख असलेली श्री महाकाली म्हणजेच दक्षिणाभिमुखी श्री महाकाली देवीचे दर्शन होते. या देवीच्या बाजूला तिचे अंगरक्षक श्री क्षेत्रपाल यांची सुद्धा लहान मूर्ती पाहावयास मिळते. श्री महालक्ष्मी हि महिषासुरमर्दिनी च्या रूपामध्ये आहे, तर श्री दक्षिणाभिमुखी देवी कालिकेच्या रूपामध्ये आहे.
अलीकडेच मंदिराचे नूतनीकरण केले आहे. मंदिरामध्ये प्रवेश केला कि सुंदर लाकडी नक्षीकाम केलेला सभामंडप दिसतो. व मधोमध देवीच्या मूर्तींचे स्थान. मंदिरामध्ये दोन पुरातन अशा मोठ्या आकाराच्या पितळेच्या समया ठेवल्या आहेत, नवरात्री व इतर सण उत्सवाच्या वेळी ह्या समया देवीसमोर प्रत्यालीत करण्यात येतात. या सामयांवर पुरातन लिपीमध्ये काही लिहिलेलं सुद्धा दिसते. मंदिरामध्ये एक जुना व मध्यम आकाराचा नगारा सुद्धा आहे. देवीचे मुखवटेसुद्धा फार पुरातन असून ते श. के. १७९१ सालचे असल्याचे दिसून येते.
उत्सव – शारदीय नवरात्रीला श्री दक्षिणमुखी देवीच्या मंदिरामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. देवीच्या सर्व रूपांना दागदागिन्यानी मढविले जाते व फुलांची फार आकर्षक सजावट म्हणजेच फुलांची वाडी केली जाते. हि सजावट नवरात्रीच्या ९ रात्री अधिक एकादशीपर्यंत असे १२ ते १३ दिवस सुंदर आरास नित्यनेमाने रोज केली जाते, याचे सर्व नियोजन श्री विकास पिंपळे हे सांभाळतात, व यामध्ये बाबल्या काका मोहिते , वसंत करमरकर व गुरव कुटुंबीय यांची सुद्धा मोलाची साथ असते. मंदिरामध्ये घटस्थापना सुद्धा केली जाते. या वेळी दूरवरून मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात.
Amenities
- Bike Parking
- Car Parking