रायगड जिल्ह्यातील अलिबाग शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले श्री बालाजी मंदिर म्हणजे व्यंकटेश किंवा विष्णू मंदिर सुमारे ३०० वर्षापासून आहे असे कळते.
ह्या मंदिराच्या सुरुवातीस एक व्हरांडा व आत मध्ये प्रशस्त सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे. पूर्वीच्या मंदिरांमध्ये छताला आधार देणारे जे खांब असायचे त्याच्या चारही बाजूंना नक्षीदार काम असायचे. असेच नक्षीकाम ह्या मंदिराच्या पुढील बाजूस हत्तींच्या स्वरूपात दिसून येते. फार पूर्वी अगदी जेव्हा विविध लेण्या कोरल्या गेल्या तेव्हा अशाच हत्तींचा वापर खांबांवर केला गेला. हत्ती हा ऐश्वर्या, राजवैभव याचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामूळेच मंदिरांमध्ये हत्तीचे अंकन वेगवेगळ्या ठिकाणी केले गेले आहे. गाभार्याच्या मध्यभागी एका चौथऱ्यावर श्री बालाजी ची साडेचार फूट उंचीची, पंचधातूची, शंख चक्र व गदाधारी विराजमान झालेली अशी सुंदर मूर्ती असून श्री बालाजी यांच्या दोन्ही बाजूस देवीच्या मुर्त्या आहेत.
सभागृहावर गोल घुमट आहे तर गाभार्याच्या वर सुबक कोरीव काम केलेला घुमट आहे. त्यावरील दगडी कोरीव काम अतिशय लक्षवेधक आहे. या ऐतिहासिक मंदिराची देखभाल श्री कान्होजी आंग्रे सरकार यांचेकडे होती व त्यानंतर अलिबाग येथील मोदी कुटुंबाकडे देखभाल आली. परंतु अनेक वर्ष या मंदिराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे वास्तूची देखभाल होऊ शकली नाही. मात्र सन १९८८ मध्ये हे मंदिर धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आले.
अलीकडेच काही वर्षांपूर्वी या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले आहे. त्यावेळी मूळ स्वरूपातील दगडी कळसाला तसेच इतर दगडी बांधकामाला रंग लावण्यात आला.
Amenities
- Bike Parking
- Car Parking