अलिबागला नवे रूप आले ते सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात. कोकण किनारपट्टीवर निर्विवाद वर्चस्व गाजवून इंग्रज, पोर्तुगीझ आणि इतर परकीयांवर वचक बसविणारे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी सतराव्या शतकाच्या अखेरीस अलिबाग शहर नव्याने उभारले. अशा कान्होजी आंग्रेंची समाधी अलिबाग शहराच्या अगदी मधोमध आहे
सरखेल कान्होजी आंग्रे यांचा इतिहास-
तुकोजी सकपाळ हे आंग्रे घराण्याचे मूळपुरुष. शिवाजी महाराजांनी त्यांस आरमारात मोठ्या हुद्द्यावर नेमले होते. त्यांचे वंशज कान्होजी. कान्होजींस आंग्रे हे नाव पुण्यापासून सहा मैलावरील मावळ प्रांतातील आंगर वाडी या नावावरून मिळाले. त्यांचे मूळ आडनाव सकपाळ होते.
अत्यंत पराक्रमी, धैर्यवान कार्यक्षम नेता म्हणून कान्होजींनी आपली योग्यता दाखवली. परकीय देशांची गलबते लुटून त्रावणकोर ते मुंबई पर्यंतची सर्व गावे, शहरे लुटून त्यांनी ती जिंकली. अलिबाग जवळील कुलाबा किल्ला हे त्यांनी आपले प्रमुख केंद्र बनवले आणि सुवर्णदुर्ग तसेच रत्नागिरी जवळील विजयदुर्ग येथे आपला आरमारी तळ बनवला.
कान्होजींच्या मोहिमेचे मुख्य ध्येय हे संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या संघर्षात सिध्दीने बळकावलेल्या मराठा प्रदेश पुन्हा मिळवणे हे होते. ज्या परकीय सत्ता आंग्रेंच्या आज्ञा पाळण्याचे नाकारतील त्या आपल्या व्यापारावर आक्रमणाचा धोका ओढवून घेतील असे त्यांनी घोषित केले. पन्नास वर्षांच्या सरखेलीच्या कारकिर्दीत आंग्रे यांनी मराठ्यांचे सागरी सामर्थ्य खूप वाढवले आणि मुघलांचे वर्चस्व जवळ जवळ निष्प्रभ केले. उरलेल्या लहान सत्तानी तर आंग्र्यांचे वर्चस्व मान्य केले आणि त्यांचे अधिकारात शांततेने राहिले.
सन १६९९ मध्ये सिद्धी आणि पोर्तुगीजांनी आंग्रेंच्या विरोधात मुघलांशी सलोखा केला. परंतु कान्होजींनी या त्रयींचा पराभव करून आपल्या सामर्थ्याचा तडाखा बसवला. नंतर त्यांनी सागरगड व जवळचा प्रदेश जिंकून घेतला. पराजित विरोधकांना त्यांनी मोठ्या अटी स्वीकारण्यास भाग पाडले. त्यामध्ये त्यांनी कुलाबा, सागरगड, खांदेरी, राजकोट , चौल,अलिबागजवळील परहूर या विभागांच्या उत्पन्नाचे विभाजन केले.
इ स १७०७ ते १७१० या काळात महाराणी ताराबाई यांनी कान्होजी आंग्रेंची मुंबई ते सावंतवाडी पर्यंतच्या मराठा राज्याच्या किनारपट्टीची प्रमुख म्हणून नेमणूक केली. सन १७१४ मध्ये शाहूराजे व कान्होजी यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार कान्होजींनी जिंकून घेतलेले सर्व किल्ले शाहूंना परत केले. तर कान्होजींना दहा किल्ले, देवगड ते खांदेरी पर्यंत कोकणातील १६ किल्ले व उभारलेली गावे दिली आणि मराठी आरमाराचे प्रमुख पद आणि सरखेल हा मनाचा किताब देण्यात आला.
समुद्रावरील वर्चस्व –
या काळानंतर कान्होजींचे समुद्रावरचे वाढते वर्चस्व पाहून इंग्रजांनी त्यांच्याशी करार केला व इंग्रजी व्यापाऱ्यांनी कर भरला तर त्यांना व्यापारास परवानगी दिली गेली. व कान्होजी आंग्रेंच्या माणसांना मुंबईत सुविधा व सवलती देण्यात याव्या असे ठरले. पुढे कान्होजी आंग्रे यांनी सतत आपले वर्चस्व वाढते ठेवले व परकीय सलतनतपुढे वचक निर्माण केला. त्यांच्या आर्मरमध्ये १५० त २०० टन ओझे वाहू शकणारी गलबते होती. या जहाजावर नऊ ते बारा पौंडी तोफा होत्या. हि सर्व गलबते ४० ते ५० भक्कम वल्ह्याच्या साहाय्याने चालत. आरमाराच्या एका ताफ्यामध्ये अशा प्रकारची ८ ते १० गुराबे आणि ४० ते ५० गलबते असत.
अलिबाग शहराची उभारणी-
सतराव्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी अलिबाग शहर नव्याने उभारले. सन १७२० मध्ये रामनाथ भागातील हिराकोट नामक भुईकोट किल्ला कान्होजी आंग्रेनी बांधला. किल्यात आंग्रेंचा खजिना असे, आज तेथे कारागृह आहे.
अत्यंत करारी धैर्यवान व कार्यक्षम कान्होजी आंग्रे यांनी आपल्या कारकिर्दीत इंग्रज पोर्तुगीज व डच या परकीय शक्तींचा पराभव केला. कान्होजी आंग्रे हे कृष्णवर्णीय धिप्पाड व बलदंड शरीरयष्टीचे होते. त्यांचे डोळे अत्यंत चमकदार पण चेहरा अगदी उग्र होता. कान्होजी आंग्रे हे ४ जुलै १७२९ रोजी अल्प आजारानंतर मरण पावले. अशा ह्या सामर्थ्यवान लढवय्यास कोटी कोटी प्रणाम!
संदर्भ – रायगड गॅझेटियर