अलिबाग आणि परिसर पावसाळ्यात अतिशय नयनरम्य निसर्गाविष्काराने खुलून जातो. कोकणाचे खरे सौन्दर्य पाहावे तर पावसाळ्यात. सगळीकडे हिरवेगार गालिचे, खळाळून वाहणाऱ्या नद्या आणि उंच धबधबे. असाच एक सुंदर मनमोहक धबधबा म्हणजे सिद्धेश्वरचा धबधबा. पावसाळ्यात या परिसराचे सौदर्य फारच अप्रतिम असते.
अलिबागपासून साधारणतः ५ ते ६ किमी अंतरावर खंडाळे गावामधून सिद्धेश्वराला जायचा मार्ग आहे. मुख्य रस्त्यापासून साधारणतः २ ते ३ किमी आतमध्ये जंगलवाटेने चालत गेल्यावर एक माध्यम आकाराचा पाण्याचा ओढा लागतो, ओढ्याला पाणी कमी असेल तर सहज पार करता येतो, ओढा पार केला कि सिद्धेश्वर डोंगर लागतो आणि मग दगडी पायऱ्या. काही अंतर पायऱ्या चढल्या कि उजवीकडे एक छोटीशी टेकडी लागतो जे विश्रांतीचे ठिकाण आहे. या टेकडीच्या माथ्यावरून चारही बाजूला पहिले तर दिसतात हिरवेगार डोंगर, आणि मधेमधे विखुरलेली गावांची वस्ती, आणि मग एका बाजूला उंच कातळावरून फेसाळत कोसळणारा पांधरा शुभ्र धबधबा. येथून धबधब्याचे जे मनमोहक दृश्य दिसते ते आठवणीत साठवण्यासारखे असते. तीन बाजूने गर्द हिरवे डोंगर आणि मधोमध पांढरा शुभ्र असा उंचावरून फेसाळत खाली कोसळणारा धबधबा पहिला कि मन प्रसन्न होते. हे विहंगम दृश्य पहिले कि त्या पाण्याखाली जाण्याचा मोह आवरत नाही.
सिद्धेश्वर मंदिर –
या टेकडीपासून पुढे गेले कि एक पायवाट जाते ती धबधब्याकडे आणि मुख्य रस्ता जातो वर मंदिराकडे. वर मंदिराकडे जाण्यासाठी काही पायऱ्या तर काही डोंगराळ पायवाट. सिद्धेश्वर मंदीर साधारण असले तरी आजूबाजूला काही ऐतिहासिक खाणाखुणा सापडतात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मधोमध शिवपिंडी आहे. तसेच एका कोपऱ्यामध्ये जुनी पितळी घंटा व पितळी ढोल ठेवले आहेत. मंदिराच्या समोरच एक उंच वटवृक्ष आहे. पुढे थोड्या अंतरावर रामानंद संप्रदाय वैरागी मठ आहे आणि समोरच एक गोड्या व थंडगार पाण्याची विहीर. मागच्या बाजूने एक मोठा ओढा वाटतो आणि हाच पुढे जाऊन खोलवर धबधब्याच्या स्वरूपात कोसळतो. मंदिरामध्ये श्रावण महिन्यात बरेच भाविक दर्शनाला येतात.
वीरगळ –
मंदिरासमोर काही पुरातन दगडी अवशेष सापडतात यामध्ये प्रामुख्याने एक वीरगळ दिसून येते. यावरील कोरीव काम फारशे स्पष्ट नसून त्यावर रंग चढविलेला आहे. बाजूलाच एक दगडी खांबाचे नक्षीदार अवशेष तसेच एक जुनी शिवपिंडी दिसून येते.
धबधबा –
धबधब्याच्या मधल्या बाजूला जाण्यासाठी एक पायवाट येथूनच आहे. थोडी कसरत करूनच धबधब्याजवळ जात येते. पण जवळ गेले कि जो निसर्गाचा चमत्कार दिसतो तो थक्क करून टाकतो. साधारणतः १०० फूट उंच कातळ आणि वरून फेसाळत कोसळणारा धबधबा. उंचावरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे येथील माती वाहून गेल्याने मोठी मोठी खडके दिसू लागलीत. कातळावर शेवाळ असल्याने यथे फार पुढे जाऊ नये.
पर्यटन –
पावसाळ्यात एका दिवसाचा छोटासा ट्रेक करायला अलिबाग आणि परिसरातील हौशी ट्रेकर्स तसेच बरेच पर्यटक सुद्धा येतात. येथील निसर्ग सौंदर्यामुळे हे ठिकाण पर्यटकांच्या पसंतीला फार लवकर उतरलंय. चला तर मग पावसाळ्यामध्ये सिद्धेश्वर च्या धबधब्याचा, पावसाचा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी.