चौल –
इतिहासाची साक्ष देणारे व आंग्रेकालीन अष्टागारातील एक प्रमुख ठिकाण. मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रसिद्ध बंदर. चौल येथे साधारणतः ३०० ते ३५० मंदिरे अस्तित्वात होती. आता फक्त काही मंदिरे पहावयास मिळतात, त्यातील एक महत्वाचे मंदिर म्हणजे श्री क्षेत्र रामेश्वर. चौल नाक्यावरून रेवदंड्याकडे जाताना डाविकडे हे मंदिर दिसते.
श्री रामेश्वर मंदिर –
श्री रामेश्वर हे येथील प्राचीन मंदिर आणि चौलचे ग्रामदैवत! कौलारू छप्पर असलेले जुन्या पद्धतीतील हे मंदिर नारळी पोफळीच्या झाडांनी वेढलेले आहे. मंदिराच्या समोरच नंदीमंडप व एक भली मोठी पुष्करिणी आहे. हि पुष्करिणी पावसाळ्यामध्ये पूर्णपणे भरते. गाभाऱ्यातील शंकराची पिंडी थोडी खोलगट असून चारी बाजूला थोडे उंच आहे. जेव्हा गावावर काही संकट येते तेव्हा हि पिंडी, भोवताली पाण्याने भरून ठेवली जाते, अशी श्रद्धा आहे. गाभाऱ्यामध्ये पार्वतीमातेची मूर्ती दिसत नाही, गाभाऱ्यामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही.मंदिरामध्ये एका बाजूला गणपतीची जुनी मूर्ती आहे
मंदिरातील कुंड –
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या सभामंडपात फरशीखाली तीन कुंडे आहेत. पर्जन्यकुंड , वायूकुंड आणि अग्नीकुंड. दुष्काळ पडला की, ‘पर्जन्यकुंड’, वादळ वारा सुटला की ‘वायूकुंड ’ आणि फार थंडी पडली, गारठा वाढला की, ‘अग्नी कुंड’ उघडायचे अशी परंपरा आहे. इतिहासातील पर्जन्य कुंड उघडण्याच्या नोंदी आहेत. इ. स. १६५३, १६३१, १७९०, १८५७, १८७६, १८९९, व सर्वात शेवटी रविवार श्रावण शुद्ध शके १८६३, दि २७ जुलै १९४१ रोजी उघडले.
मंदिराला लागूनच छानसा लाकडी नक्षीकाम केलेला सभामंडप आहे. सभामंडपाशेजारी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे याच मंदिरात गणपतीच्या दोन जुन्या मूर्ती सुद्धा आहेत. मंदिराबाहेर दोन मोठ्या सुंदर दीपमाळा आहेत. मंदिराच्या आजूबाजूला बऱ्याच प्राचीन वास्तू व खाणाखुणा सापडतात. मंदिराच्या एका बाजूला सलग एका रेषेत नऊ छोट्या दगडी पिंडी दिसतात. मंदिराच्या मागच्या बाजूला पाच दगडी शिळा ठेवलेल्या आहेत. येथेच एक मोठ्या आकाराचा दगडी पाया आहे व त्याच्या एका बाजूला अर्धवट पडझड झालेली षट्कोनी वास्तुरचना आहे.
उत्सव-
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे विशेष पूजाअर्चा होतात, भाविकांची प्रचंड गर्दी दर्शनासाठी होत असते.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी येथे फार सुंदर अशी दिव्यांची आरास केली जाते. या वेळी मंदिराचे सौंदर्य फारच अप्रतिम असते.
असे हे ऐतिहासिक श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर एकदा तरी पाहायलाच हवे
जवळचे आकर्षण –
कसे पोहोचाल –
- अलिबागपासून अंतर – १८ कि. मी.
- मुंबई ते अलिबाग – १०० कि. मी.
- पुणे ते अलिबाग – १४५ कि. मी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे