रायगड जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवर अलिबागपासून साधारणतः २५ किमी अंतरावर हिरव्यागार झाडीच्या कुशीत वसलेले घनदाट जंगल म्हणजे “फणसाड अभयारण्य ” . ५२ चौ किमी क्षेत्रावर विस्तारलेल्या या अभयारण्याला निसर्गाचा वरद हस्तच लाभलेला जणू. येथील उपलब्ध असलेल्या अफाट जैव विविधतेचे संरक्षण व जतन व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने दि २५ फेब्रुवारी १९८६ मध्ये फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले.
वृक्ष संपदा –
फणसाड अभयारण्य जैव विविधतेने नटलेले आहे येथे विविध प्रमाणात झाडे आढळतात. यामध्ये साग, निलगिरी, ऎन, किंजल, जांभूळ, हेद , कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, यासोबत सीताअशोक, सर्पगंधा, कुर्डू, रानतुळस, अशी अनेक औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. वाकेरी, वाघाटी, पळसवेल, पेंट गूळ , इत्यादी वेली, तसेच जगातील सर्वात लांब असलेल्या वेलींपैकी एक अशी गारंबीची वेल सुद्धा मोठ्या प्रमाणात सापडते.
पक्षी व फुलपाखरे –
येथील वृक्षसंपदेला शोभेल अशी येथे फुलपाखरे आणि पक्षी सुद्धा बरेच आहेत. येथे फुलपाखरांची स्वतंत्र उद्यान केले आहे व तेथे विविध प्रकारची झाडे आहेत ज्यावर अनेक प्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरे मुक्त संचार करीत असतात. यामध्ये प्रामुख्याने ब्लू मॉरमॉन, मॅप, कॉमन नवाब, ब्लु टायगर हि फुलपाखरे सापडतात. पक्षांच्या तर येथे १६४ प्रजाती आढळतात. यामध्ये प्रामुख्याने बुलबुल, रानकोंबडा, धनेश, कोतवाल, हळद्या, तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक , सुतार, हरियाल, कोकीळ इत्यादी गाणारे पक्षी तर घुबड, ससाणा, सर्पगरुड, गिधाड, अशी शिकारी पक्षी. दुर्मिळ पक्षांपैकी तिबेटी खंड्या व श्रीलंकन फ्रॉगमाऊथ , ग्रे हॉर्नबिल, मलबार पाईड, सुद्धा सापडतात. येथे खास पक्षी निरीक्षणासाठी काही ठिकाणी पक्षी निरीक्षण मनोरे सुद्धा बांधण्यात आले आहेत. पण यासाठी सकाळी लवकर गेलात तर पक्षी दर्शन आणि सुंदर अनुभव येऊ शकतो
प्राणी –
फणसाड अभयारण्यामध्ये साधारणतः १५ पेक्षा जास्त प्रकारचे प्राणी आढळतात. यामध्ये रानससा, सांबर , भेकर, पिसोरी, साळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा , वानर, माकड, रानमांजर, व क्वचित काळी बिबट्या, तसेच पर्यटनासाठी अभ्यासाचे आकर्षण असलेले शेकरू सापडतात.
याचबरोबर नाग, घोणस, मण्यार असे विषारी व हरणटोळ, तस्कर असे बिनविषारी साप येथे आढळतात.
येथे भटकंतीसाठी विविध वाट तयार केल्या आहेत, येथे २७ पाणस्थळे आहेत, फणसाड गाण आणि सावरट तलाव येथील बिबट्याची गुहा पाहणे हा थरारक अनुभव आहे. येथून एका मनोऱ्यावरून अथांग समुद्राचे सुद्धा दर्शन घडते. तलावातील माश्यांची अचूक शिकार करणारे पक्षी पाहणे म्हणजे फारच मनमोहक असते.
गिधाड संवर्धन –
निसर्गाच्या अन्नसाखळीत मेलेली जनावरे खाऊन स्वच्छता राखणारी गिधाडे आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. येथील खास बनवलेले “व्हल्चर रेस्टोरंट” येथे अभयारण्य परिसरातील मृत जनावरे येथे टाकली जातात आणि यावर गिधाडे येतात.
येथे एक जुने धरण सुद्धा आहे, पावसाळ्यामध्ये अतिशय विहंगम दृश्य असते. पूर्वीच्या काळात येथील आजूबाजूच्या परिसरात याच धरणातून पाणीपुरवठा होत असे.पावसाळ्यात हे धरण पूर्ण भरून बंधाऱ्यावरून वाहू लागते व याचा आनंद घ्यायला बरेच पर्यटक येथे येत असतात. जवळच असलेल्या दोन नद्यांच्या मधोमध असलेले हे मातीचे धरण आहे. यामधून जवळच्या गावांना पाणी पुरवठा होतो. येथे पर्यटकांच्या व अभ्यासकांच्या सोयीसाठी तंबू व व्हाईट हाऊस ह्या गेस्ट हाऊस ची सोया आहे, तसेच ग्राम विकास योजने अंतर्गत बचत गटाच्या माध्यमातून रुचकर भोजनाची सुद्धा येथे चांगली सोया आहे.
असे हे निसर्ग संपन्नतेने नटलेले फणसाड अभयारण्य नक्कीच अनुभवण्यासारखे आहे
कसे पोहचाल ?
अलिबागपासून मुरुड ला जायच्या रस्त्यावरच बोर्ली मांडला हे गाव सोडले कि डावीकडे फणसाड अभयारण्यात जाण्यासाठी रस्ता आहे. अलिबागपासून साधारणतः २५-२७ किमी अंतरावर हे अभयारण्य आहे.
- मुंबई ते अलिबाग – १०० किमी.
- पुणे ते अलिबाग – १५० किमी.
- मुरुड पासून अंतर – २५ किमी.
- अलिबाग पासून अंतर – २५ किमी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे