अलिबाग आणि कोकणचे खरे सौन्दर्य पाहावे तर पावसात, पाऊस सुरु झाला कि सर्वदूर हिरवेगार गालिचे पसरतात आणि जिकडे तिकडे पाण्याचे लहान मोठे झरे आणि धबधबे वाहू लागतात. अलिबाग परिसरात डोंगराळ भागामुळे अशी बरीच निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. अशी एक जागा म्हणजे अलिबाग रोहा रस्त्यावरील बेलोशी गावाजवळ असलेला कोंडी धबधबा. अर्थातच पुरेसा पाऊस पडल्यावर हा धबधबा सुरु होतो व पुढचे ४ ते ५ महिने हा धबधबा सुरु असतो.
अलिबाग रोहा रस्त्यावर वावे फाट्यावरून डावीकडे साधारणतः ३ ते ४ किमी रस्त्याने गेल्यावर कोंडी धबधब्याकडे जाण्यासाठी एक आड रस्ता आहे. शेतावरील बांधावरून वळणावळणाच्या रस्त्याने साधारणतः २० ते ३० मिनिटे चालावे लागते. जून जुलै महिन्यामध्ये येथे बऱ्याचश्या शेतांमध्ये भात लावणी चालू असते. अशावेळी काही हौशी २ मिनिटासाठी शेतात उतरतात व भात लावणी करण्याची मजा लुटतात. शहरी पर्यटकांसाठी हा एक अनोखा अनुभव असतो.
या पूर्ण रस्त्यामध्ये तुमचा मोबाइल किंवा DSLR कायम फोटो घेत असतो, इतके येथील निसर्गसौन्दर्य तुम्हाला भुरळ घालते. पुढे गेल्यावर छोटासा डोंगराळ भाग चढल्यावर नजरेस पडतो तो खळखळणारा, फेसाळणारा, पांढरा शुभ्र धबधबा. आजूबाजूला गर्द हिरवी झाडी आणि मधोमध साधारणतः ३० ते ४० फूट रुंद व २५ फूट उंचावरून फेसाळत कोसळणारा धबधबा, आणि त्याचा प्रचंड आवाज आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. धबधब्याजवळ असलेल्या मोठाल्या दगडांवर येथील काही स्थानिक कलाकारांनी विविध प्राणी, पक्षी, होड्या अशी चित्रे रंगवली आहेत, हिरव्यागार परिसरात खळाळणाऱ्या शुभ्र पाण्यासोबत हि रंगीबेरंगी चित्रे नक्कीच नजर वेधून घेतात.
पांढरे शुभ्र फेसाळणारे पाणी पाहिले कि पाण्यात उतरायचा मोह आवरता येत नाही. परंतु पाण्याचा प्रवाह पाहूनच पुढे जावे. धबधबा गावापासून थोडासा लांब असल्यामुळे जवळपास खाण्यापिण्याची सोय नाही. त्यामुळे सोबत थोडेसे खाद्यपदार्थ घेऊन गेलात तर चांगले. परंतु या निसर्गाच्या सानिध्यात प्लास्टिक व इतर कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी. येथील निसर्गरम्य वातावरणातून परत येणे थोडे कठीणच असते. शहरातील रोजच्या व्यस्त जीवनातून या ठिकाणचे थोडे सानिध्य सुद्धा सुखावून जाते.