अलिबाग शहरातील पुरातन व प्रसिद्ध देवस्थान, सहाराच्या मधोमध वसलेल्या कालंबिका देवीला अगदी आंग्रेकाळापासून इतिहास आहे. ह्या देवीला काळंबा देवी असेही म्हटले जाते.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये असलेल्या सुवर्णदुर्ग किल्ल्यामध्ये कालंबिका देवीचे मूळ स्थान होते , हि देवी सरखेल कान्होजी आंग्रे यांची कुलदैवत. सरखेल आंग्र्यांनी हि देवी येथून हलवून नंतर अलिबाग येथील हिराकोट किल्ल्यामध्ये देवीची स्थापना केली. पुढे देवीचे स्थान किल्ल्यामधून बाहेर आणून अलिबाग शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आले. येथेच कालंबिका देवीचे मंदिर आहे. जुने मंदिर कौलारू होते व समोर एक छोटासा व्हरांडा होता व नंतर सभामंडप. जुन्या प्रकारच्या दगडी पायावर हे मंदिर उभे होते. व मंदिरामध्ये लाकडी खांबांवर सभामंड उभा होता. सभामंडपानंतर देवीच्या लाकडी गाभारा होता, व गाभार्याभोवती प्रदक्षिणा मार्ग. २०२० साली हे मंदिर पुन्हा नव्याने उभारण्यात आले. मंदिराशेजारी एक छोटे शिवमंदिर सुद्धा आहे. मंदिरासमोर एक भले मोठे चाफ्याचे झाड आहे.
उत्सव –
नवरात्रीमध्ये श्री कालंबिका देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. मंदिरामध्ये विधिवत घटस्थापना केली जाते. मंदिरासमोर ९ दिवस मोठी यात्रा भरते. शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने येथे भाविक फार मोठ्या प्रमाणात दर्शनाला येतात.