अलिबाग - हजारो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देणारे अलिबाग. शिवकालीन शौर्याची गाथा सांगणारे अलिबाग. जगाच्या नकाशावर विविध घडामोडींसाठी कोरले गेलेले अलिबाग. याच मातीत घडले वीर जवान, उच्च पदस्थ अधिकारी, राष्ट्रीय पातळीवरचे कलाकार, खेळाडू , व्यवसायिक. या अलिबागचा गेल्या २० -३० वर्षातला बदलता चेहरा मोहरा पाहण्याचे भाग्य लाभले त्याचे हे संक्षिप्त स्वरूप.
Visit Websiteपर्यटन
पर्यटनाला व्यावसायिक स्वरूप आले : अलिबागचा निसर्ग पर्यटकांना आकर्षित करू लागला आणि मुंबई व पुणे या मोठ्या शहरांपासून जवळ असल्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली. “मिनी गोवा” म्हणून अलिबाग प्रसिद्ध झाले. एक दिवसाच्या सहलीसाठी सुद्धा इथे मुंबई आणि पुण्याच्या पर्यटकांची गर्दी वाढू लागली, परिणामी इथला टुरिझम व्यवसाय वाढू लागला. समुद्राच्या जवळ किनाऱ्या जवळ अनेक सोयींनी समृद्ध अशी हॉटेल्स, गेस्ट हाउस, रिसॉर्ट इथे उभी राहिली. ज्यातून स्थानिकांना रोजगार मिळू लागले. समुद्र किनारे अधिकाधिक आकर्षक केले गेले. पाण्यावरचे साहसी खेळ किनाऱ्यावर दिसू लागले ज्यामुळे लाटे सोबत डुंबताना अनेक खेळांची मजा लुटताना पर्यटक इथे अधिक काळ रेंगाळू लागले. स्थानिक विक्रेते, खानावळी, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांचे व्यवसाय वाढले. खास मासे खाण्यासाठी येणारी मंडळी देखिल वाढू लागली. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीमुळे अलिबाग मधला पर्यटन व्यवसाय वाढू लागला. अलीकडे पर्यटन हा इथल्या बऱ्याच स्थानिकांचा मुख्य व्यवसाय झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन या तीन पर्यटन स्थळांना ‘ब’ श्रेणीचा दर्जा देण्यात आला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी, 15 फेब्रुवारी 21 रोजी ही घोषणा केली. मुंबई आणि पुण्याच्या जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील या पर्यटन स्थळांच्या विकासाला महत्त्व देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
अलिबाग समुद्र किनाऱ्याचे बदलते स्वरूप: अलिबाग येथील स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकारातून हिराकोट तळ्याभोवती सुंदर बगीचा फुलवला गेला ज्यामुळे इथले सौदर्य अजून वाढले. तसेच अलिबाग समुद्र किनाऱ्याला आकर्षक रूप देण्यात आले इथे सेल्फी पॉइंट उभारला गेला. तसेच विविध वॉटर गेम्स ठेवण्यात आले. इथल्या समुद्र किनाऱ्याला नवे रूप दिले गेले.
इथल्या ऐतिहासिक पर्यटनाला बळकटी देण्यासाठी रायगडचे माजी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आणि अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या धडपडीतून समुद्र किनारी टी-५५ रणगाडा बसवण्यात आला आहे. या रणगाड्याच्या माध्यमातून भारताच्या संरक्षण सामर्थ्याची ओळख अलिबाग मध्ये जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना होणार आहे. या रणगाड्यामुळे अलिबागकरांची छाती अभिमानाने फुलली आहे. अलिबागला भेट देण्यासाठी हा एतिहासिक वारसा पर्यटकांना आकर्षित करेल.
अलिबाग समुद्रकिनाऱ्याजवळ असलेला कुलाबा किल्ला, सुंदर समुद्र किनारा, वॉटर गेम्स, टी-५५ रणगाडा, सेल्फी पॉइंट हे सध्या अलिबाग समुद्र किनाऱ्याचे आकर्षण झाले आहे.
वाहतूक
मुंबई अलिबाग बोट सुविधा : गेट-वे-ऑफ इंडिया ते मांडवा अशी लॉन्च सुविधा “PNP” आणि “मालदार” या कंपन्यांनी सुरु केल्या आणि अलिबागच्या पर्यटन व्यवसायाला भरभराट आली. मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. मुंबई-अलिबाग अंतर कमी झाले. अलिबाग शहराच्या वाढीस व विकासास यामुळे गती आली.
रो रो बोट सुविधा : एप्रिल २०२१ पासून सुरु झालेल्या रो.रो. सेवे मुळे मुंबई हून सागरी प्रवास अधिक सोपा झाला. वाहन घेऊन अलिबागला येणे सहज शक्य झाले त्यामुळे महामार्गावर होणारी वहातुक कोंडी कमी झाली व अंतर, वेळ आणि इंधन बचतही होऊ लागली. मुंबईहून अलिबागला येणारे पर्यटक सध्या या सागरी प्रवासाला विशेष पसंती देत आहेत. यामुळे अलिबागच्या विकासात मोलाची भर पडणार आहे.
मुंबई गोवा मार्गाचे चौपदरीकरण : मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरी करणाचे काम सध्या सुरु आहे हे काम झाले कि महामार्गावरची वहातुक कोंडी कमी होईल व प्रवास अधिक सुखकर होईल. इतर शहरातून अलिबागला येणाऱ्या पर्यटकांची संख्या यामुळे वाढेल. अलिबाग मधील व्यापार आणि इतर उद्योगात हि वाढ होईल.
औद्योगिक
औद्योगिकरण व विकास : पर्यटन, मासेमारी व शेती हे अलिबागच्या स्थानिक लोकांचे प्रमुख व्यवसाय असले तरी इथे झपाट्याने उभे राहणारे काही प्रकल्प इथल्या विकासाची गती वाढवण्यास कारणीभूत ठरले. थळ वायशेत येथे उभारण्यात आलेला “राष्ट्रीय केमिकल व फर्टीलायजर” (RCF) चा कारखाना इथल्या विकासाच्या टप्प्यात मोलाची भर टाकतो. तसेच वडखळ येथे उभा राहिलेला “ विक्रम इस्पातचा प्रकल्प (JSW)” या प्रकल्पाने बऱ्याच अंशी इथे रोजगार निर्मिती झाली आणि अलिबागची वेगळी ओळख निर्माण झाली. अलिबाग जवळ उसर इथे देखील गॅस प्लांट “ गेल” उभारला गेला जो आता गुजरातला स्थलांतरीत झाला आहे. “जे.एन.पि.टी” बंदरामुळे देखिल इथल्या गावांचा विकास झाला.
शैक्षणीक
शाळा आणि महाविद्यालये : अलिबाग मध्ये जिल्हा परिषदेच्या तसेच शासनमान्य शाळा उभ्या राहिल्या आणि इथल्या शैक्षणीक विकासास चालना मिळाली. १९६१ रोजी इथे जे. एस. एम महाविद्याल्याची स्थापना झाली आणि इथल्या शैक्षणिक विकासास गती मिळाली. तसेच वहातुक व्यवस्था वाढली एस.टी महामंडळाच्या बस अनेक गावात सुरु झाल्या आणि आसपासच्या खेड्यातून उच्च शिक्षण घेण्यासाठी अलिबागला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली परिणामी पदवी आणि पदव्युतर शिक्षण घेणारे विद्यार्थी वाढले. “सी. एच. केळुसकर होमिओपॅथी कॉलेज आणि हॉस्पीटल” च्या स्थापने नंतर मेडिकल क्षेत्रात पदवी घेणे स्थानिक विद्यार्थ्याना सहज शक्य झाले. पुढे “दत्ता पाटील लॉ कॉलेज” च्या स्थापने मुळे इथल्या विद्यार्थ्यांना कायदयाचे शिक्षण घेण्यासाठी पुणे मुंबई इथे जाण्याची गरज राहिली नाही. तसेच “पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटी” ने सुरु केलेल्या मॅनेजमेन्ट कॉलेज मुळे वेगळ्या क्षेत्रात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणे शक्य झाले. तसेच “सेंट मेरी कोन्व्ह्रेट हायस्कूल” व “डी. के. टी. स्कूल” व “आर. सी.एफ. स्कूल आणि ज्युनियर कॉलेज” सारख्या प्रायव्हेट स्कूलची स्थापना झाली आणि इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. शैक्षणिक क्षेत्रात झालेल्या विकासामुळे अलिबागच्या प्रत्यक्ष विकासात भर पडली.
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एम.एम.आर.डी.ए) च्या मुंबई विस्ताराच्या नकाशात अलिबाग येत आहे. तसेच नुकतीच विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरीडोर बनवण्याची योजना देखील पास झाली आहे. त्यामुळे भविष्यात अलिबाग शहर आणि अलिबाग तालुक्याचा झपाट्याने विकास होईल हे निश्चित आहे.