Search
Sign In

होळी पौर्णिमा

होळी पौर्णिमा

वसंत ऋतुच्या आगमनाची चाहूल लागते आणि चाकरमान्यांची पावले गावाकडे वळू  लागतात. गणपती प्रमाणेच होळीचा उत्सव कोकणात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.अलिबाग परिसरामध्ये हा होळीचा सण उत्साहाने साजरा केला जातो. सण समारंभ आणि उत्सव साजरे करून आनंद मनसोक्त लुटायचा हीच जणू इथली परंपरा आहे.अजूनही पारंपारिक पद्धतीने इथे होळी साजरी केली जाते.शिमगा साजरा करण्याचा उत्साह लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना असतो. होळी पौर्णिमेच्या आधीच गावातून मुलांची टोळी शिमग्याची सोंगे घेऊन फिरते. घरोघर जाऊन पारंपारिक नृत्य केले जाते आणि गाणी म्हंटली जातात. 

होळीच्या दिवशी सर्व गावात उत्साही वातावरण असते. सजावट केली जाते. छोटे गाव असेल तर सगळ्यांची मिळून एकच होळी असते. मोठे गाव असेल तर वस्ती, पाड्याची  मिळून एक होळी असते. सार्वजनिक होळी पेटवली जाते. तळ कोकणा प्रमाणेच इथल्या काही गावातून ग्रामदेवतेची पालखीची गावातून मिरवणूक निघते. पारंपारिक पद्धतीने गाणी म्हणून ही पालखी नाचवली जाते. हा सोहळा बघायला समस्त गावकरी जमतात. इथे परंपरे प्रमाणे चालत आलेल्या काही पध्दती पिढीजात जपलेल्या दिसतात.

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सकाळ पासून सगळीकडे उत्साही वातावरण असते. घराघरात पुरणपोळी केली जाते. नवीन कपडे घालून गावकरी होळी उत्सवासाठी तयार होतात. चौकात होळीची तयारी केली जाते, मधोमध केळीचा खांब पुरला जातो तर काही भागात सुपारी मधोमध लावली जाते, सजावट केली जाते, रांगोळी काढली जाते, फुले तोरणे लावली जातात. गावकरी होळीची पूजा करतात मग नैवेद्य दाखविला जातो. काही गावात तरुणांच्या टोळ्या होळीतून नारळ बाहेर काढण्याचा खेळ खेळतात.

होळी प्रमाणेच होळीच्या दुसऱ्या दिवशीही आनंद साजरा केला जातो. धुळवड साजरी करण्यासाठी समुद्र किनारी लोक जमतात एकमेकांना रंग लावून उत्सव साजरा होतो. गावाकडे होळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी होळीच्या निखार्यांवर पाणी गरम करून ते अंघोळीसाठी वापरले जाते. 

हे सण म्हणजे एकीचे प्रतिक आहेत. कोकणातील लोकांमध्ये साधेपणा आहे. छोट्या छोट्या गोष्टीत इथे आनंद मानला जातो आणि तो आंनद समूह पद्धतीने साजरा केला जातो.  होळीत सगळे मनातील द्वेष, राग, गैरसमज जाळून टाकतात. नकारात्मक विचारांचे दहन केले जाते आणि  माणसे माणसात मिसळतात मने साफ होतात. हे उत्सव कुटुंब जोडून ठेवतात. गावातली एकी कायम ठेवतात. परंपरेने चालत आलेले हे सण-समारंभ म्हणजेच गावातील जनजीवन अनुभवण्या साठी पर्वणीचा काळ असतो. नोकरीच्या निमित्ताने शहरात असलेल्या पिढीला देखील या परंपरा पाळायला आवडतात. आपल्या माणसात मिसळण्याचे हेच तर निमित्त असते. हे सण प्रत्येकाला आपल्या मातीशी बांधून ठेवतात आणि आनंदी करतात.

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password