Search
Sign In

अलिबागमधील तलाव

हिराकोट तलाव -


छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी जेव्हा हिराकोट किल्ला बांधला तेव्हा किल्याच्या समोरचा दगड मोठ्या प्रमाणात काढला, व तेथेच तयार झाला हिराकोट तलाव, अलिबागमधील एक प्रसिद्ध आणि नयनरम्य तलाव. पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेल्या तलावामध्ये उन्हाळ्यातसुद्धा पाणी असते. काही वर्षांपूर्वी येथे सुशोभीकरण केले गेले. पाण्यामध्ये कारंजे सुद्धा बसविले आहे. संध्याकाळी विविधरंगी प्रकाशावर उडणारे कारंजे पहिले कि मन प्रसन्न होते.

सुशोभीकरणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येथे सभोवताली बऱ्याच दगडी कमानी बांधलेल्या आहेत व प्रत्येक कमानींमध्ये अलिबागच्या इतिहासातील बऱ्याच व्यक्तिमत्वांविषयी माहिती लिहिली आहे. यामधून अलिबाग आणि परिसरामध्ये किती महत्वपूर्ण व्यक्ती होऊन गेल्या व त्यांचे विविध क्षेत्रामधील योगदान याची माहिती मिळते. सभोवताली चालण्यासाठी अंतर्गत रस्ता सुद्धा आहे. तलावाच्या सभोवताली चारही बाजूने रस्ता आहे आणि रस्त्यापलीकडे सर्व शासकीय कार्यालये आहेत. संध्याकाळी येथील वातावरण फारच नयनरम्य असते. आणि याचा आस्वाद घ्यायला बरेच अलिबागकर येथे येत असतात. वर्षातून १५ ऑगस्ट व २६ जानेवारी च्या पूर्वसंध्येला येथे फार आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते.

Hirakot Lake

गोकुळेश्वर तलाव -


अलिबागला लागूनच असलेल्या गोंधळपाडा या गावाला लागून एक गोकुळेश्वर तलाव आहे. पूर्वी अलिबागला पाणीपुरवठा याच तलावातून होत असे. तलावाजवळच एक जुने गोकुळेश्वर शिवमंदिर आहे. अलीकडेच या तलावाचे नूतनीकरण केले आहे, व आता ह्या तलावाला भव्य असे रूप मिळाले आहे. तलावाच्या किनाऱ्यावर उंच बांध घालण्यात आला आहे, व काही ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्याच्या जागा बनवल्या आहेत. तलावाभोवती पायी फिरण्यासाठी सुद्धा जागा करण्यात आली आहे. तलावासभोवताली बरीच झाडे लावण्यात आली आहेत. हि झाडे जेव्हा मोठी होतील तेव्हा हा परिसर फारच सुंदर हिरवागार होईल हे नक्की.

कुरुळ तलाव -


कुरुळ गावामध्ये रस्त्याला लागूनच असलेला मोठा तलाव. गुलाबी कमळांसाठी प्रसिद्ध. तलावाचे दोन भाग दिसून येतात एका भागामध्ये पूर्ण कमळाच्या वेली आहेत तर दुसरा भाग मोकळा आहे. पावसाळ्यामध्ये तलाव पूर्ण भरतो. तलावाशेजारीच शंकराचे मंदिर आहे. तलावाच्या दोन भागांच्या मधोमध एक बंधारा आहे व मधोमध एक सिमेंट काँक्रिट चे रंगीत कमळ बांधलेले आहे. पावसाळ्यामध्ये या तलावामध्ये बऱ्याच प्रमाणात गुलाबी कमळे फुलतात आणि तलावाचे सौन्दर्य अजूनच खुलून दिसते.

रामधरणेश्वर तलाव -


रामधरणेश्वर मंदिराकडे जाताना वाटेमध्ये एकवीरा देवीचे मंदिर आहे. ह्याच मंदिराच्या मागच्या बाजूला थोडे खाली रामधरणेश्वर तलाव आहे. पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेला तलाव फार सुंदर दिसतो. याच तलावाचे पाणी डोंगरावरून खाली कोसळते आणि येथे एक सुंदर धबधबा तयार होतो. रामधरणेश्वर मंदिराजवळून हा तलाव पूर्णपणे पाहता येतो. पावसाळी सहलीसाठी हा परिसर अतिशय नयनरम्य आहे.

धोबण तलाव -


अलिबाग परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या काळात बऱ्याच मंदिरांचे जीर्णोद्धार झाले व बरेच तलाव पुष्करिणी बांधण्यात आल्या. अलिबागहून चौल कडे जाताना हटाळे गाव सोडले कि उजव्या बाजूला एक पुरातन तलाव दिसतो. हाच तो धोबण तलाव. हा छोटेखानी तलाव शिवकालीन असून वर्षभर ह्या तलावामध्ये पाणी असते. तलावाला लागूनच एक विहीर सुद्धा आहे.

नारायण तलाव -


चौल येथील तुलाड देवी च्या मंदिराच्या बाजूने गेलेल्या रस्त्याने नारायण तलावाकडे जाता येते. थोड्याश्या उंचावर व डोंगराच्या पायथ्याशी हा तलाव आहे. फार पूर्वी उल्कापाताने ह्या तलावाची निर्मिती झाली असे मानले जाते परंतु ह्याला काही शास्त्रीय आधार सापडत नाही. तलावाच्या जवळ डोंगरावर काही पुरातन बांधकामाचे अवशेष दिसून येतात. लांब व आयताकार असलेला तलाव पावसाळ्यामध्ये पूर्ण भरून जातो, तर उन्हाळ्यामध्ये पाणी आटते.

भोवाळे तलाव -


चौल नाक्यापासून दत्त मंदिराकडे जाण्याच्या वाटेवर भोवाळे येथे हा तलाव आहे. तलावाच्या थोडे आधी डाव्या बाजूला एका टेकडीवर भोवाळे देवीचे स्थान आहे. आणि याला लागूनच हा तलाव आहे. तलावाच्या सभोवताली हिरवीगार झाडे आहेत. अलीकडेच या तलावामध्ये बोटींग चालू केले आहे. ऐतिहासिक चौल मधील ३६५ तलावांपैकी हा एक असावा.

हटाळे तलाव -


नागाव येथील हाटाळे येथे नागेश्वराच्या मंदिरासमोर मोठाला असा पुरातन तलाव आहे. हाच तो हाटाळे तलाव. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये साधारणतः इ. स. ७० ते ८० च्या दरम्यान बांधलेल्या पाच विहिरी आहेत. तलावाचे पाणी थोडे कमी झाले कि या दिसतात. परंतु तलावाचे पाणी पूर्णपणे आटल्याचे ऐकिवात नाही. तलावात उतरण्यासाठी दोन ठिकाणी दगडी पायऱ्या आहेत. तलावाला सर्व बाजूने दगडी बांध आहे, काही ठिकाणी हा बांध तुटलेला दिसतो. तलावाच्या परिसरामध्ये काही स्वरूपात जुनी बांधकामे सुद्धा दिसून येतात. तलावाजवळ असलेल्या वडाच्या झाडावर OpenBill Stork ह्या पक्षांची अनेक घरटी असून हे पक्षी येथेच वास्तव्यास असतात. येथेच हाटाळ्याचा आठवडी बाजार सुद्धा भरतो.

Sign In अलिबाग ऑनलाईन

For faster login or register use your social account.

[fbl_login_button redirect="" hide_if_logged="" size="large" type="continue_with" show_face="true"]
or

Account details will be confirmed via email.

Reset Your Password