पर्यटन स्थळ म्हणून “अलिबाग” नावारूपाला येत आहे. इथले सुंदर समुद्र किनारे आणि मोहून टाकणारा निसर्ग इथे भेट देणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा पुन्हा येण्यास भाग पाडतो. रस्त्याच्या दुतर्फा पसरलेल्या नारळी पोफळीच्या बागा अलिबागच्या सौदर्यात आणखी भर टाकतात. इथल्या शांत सुंदर निसर्गाची भुरळ पर्यटकांना पडली नाही तरच नवल. ऋतू प्रमाणे इथला निसर्ग देखिल आपले रूप बदलत असतो. ऋतूनुसार विविध रंगांची, गंधाची फुले फुलतात आणि इथला सुंदर निसर्ग आणखी सुदंर दिसू लागतो. परसात, बागेत, रस्त्यात गंध आणि रंग पसरवत मुक्त हस्ते फुलणारी विविध फुले पहाणे म्हणजे डोळ्यांना सुख असते. निसर्ग रम्य अलिबागला फुले आणि फळांचा प्रदेश म्हंटले तरी त्यात काही वावगे ठरणार नाही.
कोकणच्या माणसांना फुलांची आवड असते म्हणूनच कुंपणा पासून मागच्या अंगणा पर्यंत प्रत्येक घरा भोवती अनेक फुलझाडे लावलेली दिसतात आणि त्या झाडांची प्रेमाने जोपासना करणारी माणसे देखील इथे पहायला मिळतात. निसर्गावर भरभरून प्रेम करणारी ही साधी माणसे रंग आणि गंधांत रमून जातात. मनापासून आयुष्य जगणे आणि मातीशी एकरूप होणे म्हणजे काय असते ते इथल्या माणसांच्या सहवासात काही दिवस घालवल्यावरच कळू शकेल.
Visit Websiteगुलाब (Rose) :-
गर्द गुलाबी सुरेख रंगांची फुले, फिकट हिरवी मोठी पाने, मोठ्या कळ्या आणि मंद सुगंध हे कोकणातल्या गुलाबाचे वैशिष्ट. अलिबाग मध्ये प्रत्येक घराभोवती असणाऱ्या वाड्यांमध्ये पुढच्या अंगणात हमखास गुलाबाची झुडुपे आढळतात. या झडूपांना फुले गुच्छाने येतात. विशेषतः फिकट गुलाबी किंवा गडद गुलाबी रंगांची फुले असतात. ही फुले गावठी गुलाब म्हूणून प्रसिद्ध आहेत. येथील लोकल मार्केटमध्ये ही फुले परडीत विकायला घेऊन बसलेल्या महिला आपल्याला दिसतात. पूजेसाठी या फुलांचा वापर होतो. स्थानिक मंदिरांच्या गाभाऱ्याची शोभा या फुलांमुळे वाढते. गुलाब फुलांचा वापर कुरून सुंदर हार इथले फुलवाले बनवतात. या गुलाबाचा वापर गुलकंद करण्यासाठी होतो. तसेच इथल्या स्त्रिया केसात देखील गुलाब फुले माळतात. हिरव्यागार झाडावर गुलाबी रंगांची ही फुले खूप सुंदर दिसतात त्यामुळे परिसराचे सौदर्य वाढते तसेच या फुलांचा मंद गोड सुगंध मन प्रसन्न करतो. अत्तर, औषधे, सुगंधी द्रव्ये, साबण, अगरबत्ती बनवण्या साठी गुलाबाला चांगली मागणी आहे .
झेंडू (Marigold) :-
अश्विन आणि कार्तिक महिन्यात आलिबाग परीसरामध्ये झेंडूची फुले सर्रास आढळतात. परसात किंवा शेताच्या बांधावर फेरफटका मारताना झेंडूची टवटवीत व ताठ देठाची फुले पहायला मिळतात. नारंगी आणि पिवळ्या रंगाची ही फुले खूपच आकर्षित दिसतात. सणासुदीला या फुलांचा होणारा वापर लक्षात घेऊन काही प्रगतशील शेतकऱ्यांनी आता झेंडूची शेती देखील करायला सुरुवात केली आहे. कुंपणा भोवती, अंगणात दसरा आणि दिवाळीच्या आसपास ही फुले फुललेली दिसतात. पूजेसाठी, सजावटीसाठी कोकण वासिय झेंडूचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. फुललेल्या झेंडूची फुले परिसरातल्या सौदर्यात भर टाकतात. झेंडूची फुले हंगामी फुले आहेत. गावठी झेंडूला गंध देखील असतो. इथले लोक या फुलांचा मखमलीची फुले असेही म्हणतात. डोंगराळ भागातही मोठ्या प्रमाणावर झेंडू लावलेला दिसतो आणि हंगामात बाजारपेठा केशरी, पिवळ्या फुलांनी सजलेल्या दिसतात.
जास्वंद (Hibiscus) :-
प्रत्येक अंगणात, कुंपणा जवळ हमखास आढळणारी फुले म्हणजे जास्वंदीची फुले. जास्वंदीचे अनेक प्रकार अलिबाग मध्ये पहायला मिळतात. यामध्ये एकेरी आणि दुहेरी पाकळ्या असलेली लाल, गुलाबी, पिवळा, अबोली, पांढऱ्या रंगांची फुले मुख्यत: आढळतात. कातर पाकळ्या असणारी लाल रंगांची एक वेगळी जात देखील इथे पहायला मिळते. घराघरात पूजेला हीच फुले वापरतात. भरपूर प्रमाणात फुलणाऱ्या जास्वंदीच्या फुलांना गणपतीच्या दिवसात खूप मागणी असते.
अबोली (Firecracker) :-
नाजूक फिकट नारंगी रंगाची अबोलीची फुले अलिबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. घराचे अंगण, कुपणा जवळ, बांधावर, वाड्यां मध्ये अबोली फुललेली दिसून येते. नाजूक दांडा असलेली आकर्षक फिकट नारंगी रंगांची अबोली फार सुंदर दिसते. अबोलीच्या फुलांना विशेष गंध नसतो. कोकणी माणसांना फुलांची आवड आहे. रोज डोक्यात फुले माळणाऱ्या अनेक स्त्रिया येथे पहायला मिळतील. अबोलीच्या फुलांचे गजरे, वेण्या खूप सुंदर दिसतात त्यामुळे लग्न, सण समारंभ अशा अनेक प्रसंगात अबोलीच्या फुलांना चांगली मागणी असते. ही फुले भरपूर प्रमाणात फुलतात व लगेच सुकत नाहीत त्यामुळे अंगणाची शोभा वाढवतात. गडद नारंगी, फिकट नारंगी, पिवळा अशा रंगांची अबोलीची फुले अलिबाग मध्ये पहायला मिळतात.
चाफा :-
सुवर्णा सारखा पिवळा धम्मक रंग आणि वेड लावणाऱ्या गंधाचे वरदान असलेला “चाफा” म्हणजे प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय. वाऱ्याच्या मंद झुळूके सोबत दूरवरून येणारा चाफ्याचा गंध मनाला प्रसन्न करतो. कोकणात आढळणाऱ्या फुलांमध्ये चाफ्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. येथील घराजवळ, बागेमध्ये सोन चाफ्याचे झाड असते. देव पूजेसाठी,डोक्यात माळण्यासाठी तसेच सुगंधी द्रव्ये, अत्तर, अगरबत्ती बनवण्यासाठी चाफ्याचा उपयोग होतो. सोन चाफा, पिवळा चाफा, हिरवा चाफा, पांढरा चाफा, लाल चाफा, कवठी चाफा, नाग चाफा अशा चाफ्याच्या विविध जाती आहेत. अलिबाग मध्ये या सर्व जातींची चाफ्याची झाडे दिसतात. पांढरट पिवळ्या सुवासिक फुलांची जुनी झाडे इथल्या मंदिरांच्या प्रांगणात पहायला मिळतात. आपल्या अस्तित्वाने परिसर सुगंधी व प्रसन्न करणाऱ्या चाफ्याची फुले सर्वांनाच आवडतात. कोकणी कथा, लोकसाहित्य, कविता, कादंबरी मध्ये चाफ्याच्या फुलांचा उल्लेख दिसून येतो.
बकुळ :-
“बकुळ” हे कोकणात हमखास आढळणारे लोकप्रिय फुल आहे. भले मोठे झाड व त्याला येणारी कातरलेल्या पाकळ्याची पांढरी नाजूक फुले खूपच सुवासिक असतात. बकुळीचा गजरा स्त्रियांमध्ये लोकप्रिय आहे. बकुळीची झाडे उंच आणि भला मोठा विस्तार असेलेली डेरेदार वृक्ष स्वरूपात आढळतात. अलिबाग मधील कित्येक वाड्यांमध्ये बकुळीची जुनी झाडे आहेत. बकुळीच्या गावठी झाडांच्या वाढिस खूप वर्ष लागतात पण एकदा वाढ झाल्यावर उंच डेरेदार वृक्षाला भरपूर प्रमाणात फुले येतात.
अंगणात बकुळीचे झाड असेल तर संध्याकाळची शोभा अवर्णनीय असते. सायंकाळी फुलणारी बकुळ फुले वाऱ्याच्या मंद झुळूके सोबत टपटप खाली पडू लागतात व रात्रीपर्यंत बकुळीच्या झाडाखाली फुलांची पखरण पडलेली दिसते. कोकणात मोठी घरे आणि त्याभोवती सारवलेले सुरेख अंगण असते. सायंकाळी या सारवलेल्या अंगणात बकुळीच्या फुलांचा सडा पडतो आणि दूरवर गंध पसरत जातो. आकर्षक पांढऱ्या रंगांची फुले आकाशातील चांदण्या प्रमाणे वाटू लागतात ते दृश्य बघणे आणि तो गंध अनुभवणे म्हणजे स्वर्ग सुखच. अलिबाग मध्ये अनेक ठिकाणी वाड्यांमध्ये पर्यटका साठी राहण्याची घरगुती व्यवस्था आहे. अशा ठिकाणी “होम स्टे” केल्यावर हा अनुभव घेता येऊ शकतो. सुंदर निसर्ग अनुभवणे त्याच्या सहवासात रमणे हा देखील विरंगुळा आहे. बकुळीची झाडे चौल, नागाव, आक्षी, वरसोली, रेवदंडा, मुरुड येथे समुद्रा लगद्च्या गावां मध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. केसात मळण्यासाठी नाजूक फुलांचे गजरे येथील बाजार पेठेत मिळतात. ही फुले सुकली तरी त्याचा सुगंध बरेच दिवस राहतो. अत्तर व सुगंधी द्रव्य, अगरबत्ती बनवण्यासाठी बकुळीच्या फुलांचा वापर केला जातो.
सुरंगी :-
सुरंगी ही हंगामी फुले आहेत. ती साधारण मार्च ते एप्रिल महिन्यात फुलतात. सुरंगीचे झाड मोठे वुक्ष स्वरूपातले असते. झाडाच्या कोवळ्या फांद्यांना ही फुले गुच्छांनी येतात. पिवळ्या रंगाची ही फुले मोहक सुगंधाची असतात. वाळल्या नंतरही याचा गंध राहतो. ही फुले पहाटे फुलतात आणि खूप नाजूक असतात. पूर्ण फुलल्या नंतर फांदीवरून ही अलग करणे अवघड असते म्हणून सुर्योदया पूर्वी या फुलांची तोडणी झाडावर चढून हलक्या हाताने करावी लागते. अलिबाग जवळ चौल, रेवदंडा येथील वाड्यांमध्ये सुरंगीची फुले मुख्यत: आढळतात. ठराविक हंगामात मिळत असल्यामुळे आणि अतिशय दुर्मिळ असल्यामुळे हंगामात या फुलांना चांगली मागणी असते. सुरंगीच्या फुलांचे गजरे खूप सुंदर दिसतात आणि गंध देखील अतिशय सुंदर असतो त्यामुळे या फुलांचे गजरे घालायला स्त्रियांना खूप आवडते. ज्या घरांच्या अंगणात सुरंगीची झाडे आहेत त्या घरातील माणसांना हंगामात या फुलांची विक्री करून चांगले रोजगार मिळते. सुरंगीच्या फुलांचा उपयोग अत्तर बनवण्या साठी देखील केला जातो. ही फुले अतिशय दुर्मिळ आहेत ठराविक भागात आणि फक्त ठराविक हंगामातच ही फुले फुलतात त्यामुळे ती पहायला मिळणे हे देखिल वेगळे सुख आहे. गर्द हिरवी पाने आणि मोहक सुंदर गंधांची पिवळसर फुले असलेली सुरंगीची झाडे पहाण्यासाठी हंगामात निसर्ग प्रेमींनी अलिबाग सारख्या रम्य ठिकाणाला भेट दिलीच पाहिजे.
अनंत :-
नावातच अनंत असलेली हि फुले अगणित स्वरूपात फुलतात. अनंताचे झाड मध्यम आकाराचे सदा हरित वनस्पती प्रकारात मोडणारे असते. हिरवी गार लांबट पानांची ही लहानशी झाडे कोकणातल्या वाडीत हमखास दिसणार. हंगामात असंख्य फुलांनी बहरून येणारे अनंताचे झाड बहुदा सर्वांना आवडते, लेखक कवींचे हे आवडते झाड, त्यामुळे मराठी कथा कादंबरीत अनंताचा उल्लेख आढळतो. अनंताचे फुल सफेद व सुगंधी असते. परसात फुले फुलली कि दूरवर सुगंध पसरत जातो आणि मन प्रसन्न होऊन जाते. जून ते सप्टेंबर अनंताला बहर असतो.
मोगरा (Jasmine) :-
“मोगरा” हे अत्यंत सुवासिक पांढऱ्या रंगाचे फुल आहे. या फुलांची वेल एख्याद्या झुडपा प्रमाणे वाढते. अलिबाग मध्ये आढळणाऱ्या फुलांमध्ये मोगऱ्याचे नाव प्रामुख्याने घेतले पाहिजे. या फुलांचे प्रमुख्याने दोन प्रकार आढळतात अनेक पाकळ्या असणारी डबल मोगऱ्याची फुले आणि सहा पाकळ्या असणारी एकेरी मोगऱ्याची फुले. शुभ्र पांढरा रंग आणि मोहक सुंदर सुगंध यामुळे स्त्रियांमध्ये मोगरा खूप प्रसिद्ध आहे. कोकणातील माणसे उत्सव प्रिय व फुल वेडी आहेत त्यामुळे उत्सव, सण, लग्न, समारंभात मोगऱ्याच्या फुलांना प्रचंड मागणी असते. हार, गजरे, सजावटी साठी मोगऱ्याच्या फुलांचा वापर केला जातो. अत्तर आणि सुगंदी द्रव्ये, साबण, अगरबत्त्या, सौदर्य प्रसाधने व औषधे तयार करण्यासाठी मोगऱ्याच्या फुलांचा वापर केला जातो. सुंदर गंध असलेली छोट्या आकाराची नाजूक शुभ्र मोगऱ्याची फुले सर्वांनाच खूप आवडतात. पूजेला मोगऱ्याची फुले वापरल्यास देवळाचा गाभारा प्रसन्न दिसतो. बट मोगरा, मदन बाण, एकेरी मोगरा, डबल मोगरा अशा मोगऱ्याच्या जाती आहेत. मोगऱ्याची फुले झाडावर भरपूर प्रमाणात येतात. अलिकडे मोगऱ्याची विशेष लागवड करून यापासून रोजगार मिळवले जाते. मोगरऱ्याच्या मोहक सुगंधामुळे यापासून बनवलेले अत्तर खूप लोकप्रिय आहे.
प्राजक्त :-
ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात घराच्या अंगणात प्राजक्ताचा सडा दिसतो. एकएक फुल टपटप पडून फुलांची पखरण अंगणात पडते ते दृश्य फार सुंदर दिसते. पांढरी शुभ्र केशरी देठाची प्राजक्ताची फुले अतिशय नाजूक असतात. याचा सुगंध सर्वांना आवडतो. प्राजक्ताची फुले मध्य रात्री फुलतात. ही फुले देवपूजे साठी वापरतात तसेच अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेदात प्राजक्ताचे अनेक उपयोग आहेत. अलिबाग परिसरात प्राजक्ताची झाडे बहुतेकांच्या अंगणात दिसून येतील.
सोनटक्का :-
सोनटक्का हे रंगाने पांढरे शुभ्र आणि नाजूक पाकळ्या असलेले फुल अलिबाग मध्ये अनेक घरांच्या आसपास आपल्याला दिसते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ह्या फुलांचा हंगाम असतो. ही फुले संध्याकाळी फुलतात. या उमललेल्या फुलांचा आकार साधारण फुलपाखरासारखा असतो. या फुलांना सुंदर गंध असतो. पांढरा आणि पिवळा या दोन रंगात सोनटक्का आढळतो. विशेषत: कर्दळी सारखी पाण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोनटक्क्याची रोपे वाढत जातात. आक्षी, नागाव, चौल, रेवदंडा परिसरात सोनटक्का मोठ्या प्रमाणावर आढळतो.