दसरा दिवाळी नंतर अलिबागमध्ये हंगाम येतो तो येथे असलेल्या विविध देवदेवतांच्या यात्रांचा. पूर्वी ह्या काळात परिसरातील भात कंपनी जवळ जवळ पूर्ण झालेली असे, आणि शेतकऱ्यांकडे थोड्या फार प्रमाणात पैसे आलेले असत. त्यामुळे देवदर्शनाबरोबरच वस्तुंची खरेदी, मनोरंजन या कल्पनेतून गावोगावी होणाऱ्या देवदेवतांच्या यात्रांची संकल्पना पुढे आली व तशीच ती पुढे चालू राहिली.
साजगाव - विठोबा - धाकटी पंढरी
कार्तिकी एकादशीला पंढरपुरची यात्रा सुरु होते, त्याच दिवसापासून अलिबागजवळील खोपोलीतील साजगावच्या विठोबाच्या यात्रेला सुरुवात होते. पाऊस संपल्यामुळे आता शेतीची कामे सुरु होतात, अशा दिवसात पंढरपूर येथे जाणे सर्वांनाच शक्य नसते. मग धाकटी पांढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साजगावच्या विठोबाच्या यात्रेला भाविक जातात. हि यात्रा पंधरा दिवस चालते. छोट्याश्या डोंगरावर हे मंदिर आहे व डोंगर पायथ्याशी असलेल्या मोकळ्या जागेत शेकडो छोटेखानी दुकाने थाटली जातात. त्यामध्ये विविध खाद्यपदार्थ, मसाल्याचे पदार्थ, कपडे, खेळणी अश्या बऱ्याच प्रकारची दुकाने असतात. या यात्रांमध्ये विशेष विक्री होते ती सुक्या मासळीची. यासाठी फार दूरवरून लोक येतात.आवास - श्री नागेश्वर
साधारणतः पाचशे वर्षांपूर्वी येथे आलेल्या नागोबा साधूंचे हे मंदिर. कार्तिक शुद्ध चतुर्दशीला आवास येथे अलिबागमधील पहिली मोठी यात्रा भरते. अत्यंत श्रद्धेने भाविक येथ येऊन गाभाऱ्यात लहान मोठ्या आकाराच्या घंटा बांधतात आणि नागोबा देवाचा जयजयकार करतात. या दिवशी' मंदिराच्या आवारात विविध प्रकारची दुकाने थाटली असतात. ह्या दिवसापासून अलिबाग शहराजवळील इतर यात्रा सुरु होतात
आवास - श्री नागेश्वरमापगांव - श्री कनकेश्वर
त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मापगांव येथील कनकेश्वराची यात्रा भरते. हजारो भाविक कनकेश्वराचा डोंगर चढून जातात. पूर्ण डोंगर आणि पायऱ्या दुकानांनी सजून जातात.
मापगांव - श्री कनकेश्वरवरसोली - श्री विठोबा
अलिबागला लागूनच असलेल्या वरसोली येथील आंग्रेकालीन विठ्ठल मंदिरामध्ये दरवर्षी मोठी यात्रा भरते. येथे वर्षभर एकादशीला स्थानिक बाजार सुद्धा असतो. या यात्रेमुळे स्थानिक उत्पादने, खाद्यपदार्थ व इतर वस्तुंना मोठी बाजारपेठ मिळते. पाच दिवस हि यात्रा चालते. व यात्रेदरम्यान लाखो रुपयांची उलाढाल येथे होते. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत लोक हा यात्रेला आवर्जून येतात.
वरसोली - श्री विठोबाचौल भोवाळे - श्री दत्त
डिसेंबर महिन्यामध्ये श्री दत्त जयंतीला चौल भोवाळे येथील दत्ताची यात्रा भरते. भोवाळे च्या तळ्यापासून यात्रेला सुरुवात होते व पूर्ण डोंगरावर मंदिरापर्यंत यात्रा असते. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेला सुद्धा अलिबागच्या भोवतालच्या गावातून भाविक येतात.
चौल भोवाळे - श्री दत्त