मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे. या दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर कुंडलिका नदीची खाडी आहे. खाडीवर रेवदंडा येथे साळावचा पुल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडीमार्गाने जोडले गेले आहेत. कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ उत्तर बाजूला रेवदांड्याचा किल्ला आहे. तर दक्षिणेकडे कोर्लाई गावाजवळ कोर्लाईचा किल्ला आहे. किल्ल्याचा डोंगर एखादया भूशिरा सारखा पाण्यात घुसलेला आहे.
किल्ल्याचा इतिहास:-
पोर्तुगीजांनी १५२१ मध्ये अहमदनगर सुलतानाच्या परवानगीने कोर्लाई किल्ला बांधला. बुरहान निजामच्या मृत्यूनंतर झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन पोर्तुगीजांनी किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सुलतानाने सूड उगवला आणि आपल्या काही उत्तम माणसांना हा किल्ला पुन्हा मिळवण्यासाठी पाठवले . त्यानंतर एक युध्द झाले ज्यामध्ये अहमदनगर सल्तनतने बेटावर कब्जा केला.
१५९४ मध्ये, १५०० सैनिकांसह हल्ला करून मूळचा पोर्तुगीज कर्णधार अब्रान्चेस ने हा किल्ला ताब्यात घेतला. किल्ल्याला वेढा पडल्या नंतर सल्तनतेच्या सैनिकांनी मुख्य फाटकाजवळ मृत हत्ती व आतील गेटवर एक मृत घोडा ठेवून त्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी त्यांना शरण जावे लागले व पोर्तुगीजांनी किल्ला जिंकला.
किल्ल्यातील चर्चमध्ये रविवार व सुटीच्या दिवशी पूजेसाठी जाता येत असे. कोरलई किल्ला देखील रणनीतिक दृष्ट्या फार महत्वाचा होता कारण खाडीच्या तोंडावर असल्यामुळे समुद्र मार्गे येणाऱ्या शत्रूंवर पहारा ठेवणे सहज शक्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांनी किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला. हा किल्ला १७३९-१८१८ दरम्यान मराठ्यांनी ताब्यात घेतला होता.
किल्ल्याची माहिती:-
तीन बाजूला पाणी आणि दक्षिण बाजूला जमिनीशी सांधलेला हा किल्ला सन १५२१ मध्ये दियोगु लोपिश दि सैकर या पोर्तुगीज सैन्याधिकार्याने बांधल्याचे म्हटले जाते. किल्यावर रस्त्याने सहज पोहोचता येते. कोरलाई बस स्थानकातील रस्ता लाईटहाऊस कडे जातो. किल्ल्याला तीन प्रवेशद्वारे आहेत. पश्चिमेकडील प्रवेशद्वार हा सर्वात सोपा मार्ग आहे. हा मार्ग लाईटहाऊसच्या बाजूने आहे.
प्रवेशद्वारातून आत काही पायर्या चढून किल्ल्याच्या मधोमध पोहोचता येते. पूर्वेकडील प्रवेशद्वारा जवळ जाण्यासाठी 20 मिनिट चालावे लागते. हा मार्ग मुख्य मार्ग आहे आणि मुख्यद्वारातून आत प्रवेश करता येतो. परंतु हा मार्ग कमी वापरला जातो. पावसाळ्यात या मार्गाने जाणे सोयीस्कर नाही. बंदराच्या बाजूने किंवा उत्तरेकडील बाजूने प्रवेशद्वार चांगले आहे. वरच्या तटबंदीवर भरपूर पाणी आहे.
मुख्य किल्ला पूर्व-पश्चिम अंदाजे शंभर फुट तर दक्षिणोत्तर अंदाजे एक हजार फुट विस्तारलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेश दारावर. “लढल्याशिवाय आत प्रवेश नाही” असा इशारा दगडावर कोरलेला आहे. किल्ल्यास सात दरवाजे आहेत. किल्ल्यात गोडया पाण्याची विहिर, मोडकळीस आलेला चर्च, तसेच एक मंदिर आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी समुद्रास खेटून एक जुने दीपगृह आहे. किल्ल्याच्या सुरुवातीला एक भव्य युद्धाचे मैदान होते असे म्हणतात, याची साक्ष देणारे दोन बुरुज/गढी पाहावयास मिळतात. असा हा ऐतिहासिक किल्ला बरीच वर्षे पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. सन १७४० च्या आसपास तो मराठयांच्या ताब्यात आला. परंतु १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच इंग्रजांच्या ताब्यात गेला.
स्वातंत्र्यानंतर व पोर्तुगिझ गेल्यानंतरही “पोर्तुगिझ:'” भाषा दैनंदिन व्यवहारात वापरणारं गांव म्हणून कोर्लई गाव प्रसिद्ध आहे.
किल्ल्यावर कसे पोहोचायचे :
- अलिबाग कोर्लई अंतर २२ किमी
- अलिबाग पुणे अंतर : १४५ किमी
- अलिबाग मुंबई अंतर :१२० किमी
कोर्लाई किल्ला पाहण्यासाठी आपल्याला कोर्लाई गावातून जावे लागते. कोळीवाडयातूनच किल्ल्याकडे जायला रस्ता आहे.कोर्लाई गाव हे अलिबाग – मुरुड या गाडी रस्त्यावर अलिबाग पासून २२ कि.मी. अंतरावर आहे. कोर्लाईला रोह्याकडूनही येणारा गाडी रस्ता आहे. रोहा ते मुरुड (चणेरे मार्गे) हा गाडी रस्ताही कोर्लाई गावाजवळून जातो.
जवळचे आकर्षण –
- फणसाड अभयारण्य (४ किमी)
- रेवदंडा किल्ला (४ किमी)
- मुरुड जंजिरा (२८ किमी)
- काशीद बीच (१० किमी )
- कोर्लई दीपगृह (किल्ल्याच्या मागच्या बाजूला पश्चिमेला )
ऐतिहासिक संदर्भ – रायगड गॅझेटिअर