अलिबाग समुद्रकिनाऱ्यालगत असलेला कुलाबा किल्ला पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. अलिबाग किनाऱ्यावर उभे राहिले की समोरच ऐटीत उभा असलेला कुलाबा किल्ला दिसतो. हा किल्ला दक्षिणोत्तर 267 ते 927 मीटर लांब आणि पूर्वपश्चिम 109 मीटर रुंद अशा बेटावर आहे. ओहोटी आल्यानंतर किल्ल्यात सहज चालत जाता येते.
अथांग पसरलेला अरबी समुद्र, उंच उंच सुरुची झाडे, आभाळाशी गोष्टी करणारी नारळाची उंच झाडे, मऊशार गालिचा अंथरल्या सारखी दूर पर्यंत पसरलेली सोनेरी पुळण (वाळू ). खडकांना टेकून परत फिरणाऱ्या लाटा, आणि समुद्रात ताठ मानेने रखवालदारा सारखा उभा असलेला कुलाबा किल्ला. हे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते ते अलिबाग बीच वरून. ओहोटीच्या वेळी किल्यात सहज वाळूतून चालत जाता येते. किंवा घोडा गाडी घेऊनही किल्यात जाता येते. किनार्या पासून साधारण दीड ते दोन किलो मिटर अंतरावर हा किल्ला आहे.
किल्ल्याचा इतिहास :-
समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूच्या बंदोबस्ता साठी शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले बांधले. १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले. कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला. त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता.
४ जुलै १७२९ रोजी कान्होजी आंग्रे ह्यांचे कुलाबा किल्ल्यावर निधन झाले. १७७० मध्ये पिंजरा बुरुजापाशी लागलेल्या भयंकर आगीत किल्ल्यावरील अनेक बांधकामे जळून नष्ट झाली. १७८७ मध्ये लागलेल्या दुसर्या आगीत आंग्र्यांचा वाडा नष्ट झाला. २९ नोव्हेंबर १७२१ रोजी ब्रिटीश व पोर्तुगिजांच्या संयुक्त सैन्याने अलिबागवर ६००० सैनिक व ६ युध्दनौका घेऊन हल्ला केला, पण त्यांचा त्यात पराभव झाला. प्रथम शिवशाही नंतर पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला
किल्ल्याचे बांधकाम :-
लाटांचा मारा सहन करीत अजूनही दिमाखात उभा असलेला हा किल्ला पहिला की अभिमान वाटतो. किल्ल्याचे प्रवेशद्वार किनार्याच्या बाजूस इशान्येकडे वळलेले आहे. शिवाजी महाराजांनी दुर्ग स्थापत्यात अनेक प्रयोग केले, त्यापैकी एक येथे पहावयास मिळतो. हा दुर्ग बांधतांना दगडाचे मोठे मोठे चिरे नुसते एकमेकांवर रचलेले आहेत. दोन दगडांमधील फटीत चुना भरलेला नाही. त्यामुळे समुद्राची लाट किल्ल्याच्या तटाच्या भिंतींवर आपटल्यावर पाणी दगडांमधील फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर कमी होतो. म्हणूनच आज शेकडो वर्षांनंतर ही सतत लाटांचा मारा होत असुनही तटाचे बांधकाम टिकून आहे. तटबंदी आजही मजबूत आहे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर मोर, हत्ती, हरण, कमळ, शरभ अशी शिल्पे कोरलेली आहेत. दुर्गाचा दुसरा दरवाजा अवशेष रुपात शिल्लक आहे. किल्ल्याला १७ बुरुज आहेत. चार टोकांना चार, पश्चिमेला ५, पूर्वेला ४, उत्तरेला ३ व दक्षिणेला १ बुरुज असे आहेत. बुरुजांना पिंजरा, नगारखानी, गणेश, सूर्य, हनुमंत, तोफखानी, दारुखानी अशी नावे आहेत. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर, डाव्या बाजूने गेल्यास भवानी मातेचे मंदिर लागते त्याच्या समोरच पद्मावती देवीचे छोटे व गुलवती देवीचे मोठे मंदिर आहे.
गणपती मंदिर
राघोजी आंग्रे यांनी बांधलेले सिद्धी विनायक मंदिर येथे आहे. या मंदिरातील गणपती मूर्ती संगमरवरी असून ती उजव्या सोंडेची आहे. अजूनही संकष्टीला गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. उत्तरेस मारुतीचे व दक्षिणेस शंकराचे मंदिर आहे, तिथली शांतता अवर्णनीय आहे. मंदिराच्या परिसरात पांढर्या चाफ्याच्या झाडाखाली क्षणभर विश्रांती घेतली कि मनाला वेगळ्या प्रकारची शांतता लाभल्या सारखे वाटते. तटाला धक्के देणार्या लाटांच्या आवाजाला एक लय असते ती ऐकत बसणे म्हणजे केवळ सुख असते.
परतीच्या वाटेवर डावीकडे आंग्य्रांच्या वाड्याचे अवशेष दिसतात. मंदिरासमोर चिरेबंदी बांधणीची गोड्या पाण्याची विहीर आहे. किल्ल्याच्या दक्षिण टोकाला असणार्या दरवाजाला धाकटा दरवाजा / यशवंत दरवाजा म्हणतात. या दरवाजावर गणपती, गरुड, मारुती, मगरी, कमळे, वेलबुट्टी यांची नक्षी कोरलेली आहे. दरवाजालगत कान्होजींची घुमटी व द्वाररक्षक देवतेचा शेंदुर फासलेला दगड आहे. किल्ल्याच्या तटात गोदीचे अवशेष आहेत. तेथे नवीन जहाजे बांधली जात व जूनी दुरुस्त कली जात असत. किल्ल्याच्या तटावर जाण्यासाठी पायर्या आहेत. तिथून अथांग समुद्राचे होणारे दर्शन विलोभनीय असते.
किल्ल्याच्या उत्तरेला चाके असलेल्या २ तोफा आहेत. किल्ल्यात दर्गा ही आहे. हा किल्ला २ तासात फिरून व पाहून होतो.
कुलाबा किल्ल्यापासून समुद्रात ३ ते ५ कि.मी. नैरृत्येकडे ६० फूट उंचीचा दीपस्तंभ आहे. भरतीच्या वेळी मात्र इथे जाण्याचा प्रयत्न करू नये. ओहोटीची वाट बघावी. आणि इथे फिरून यावे. किल्ला बघून आल्यावर वाळूत बसून अस्ताला जाणारा सूर्य आणि आकाशात होत जाणारे रंगांचे बदल हे सगळे पहाणे हा एक आगळा अनुभव असतो. किनार्यावर येऊन खडकाला आदळून परत फिरणाऱ्या लाटा. अथांग समोर पसरलेला समुद्र आणि समुद्राच्या कुशीत विसावा घेण्यास जाणारे लाल भडक सूर्याचे बिंब पहाताना भवताल विसरायला होते. निसर्गातला तिन्ही सांजेला घडणारा हा विलोभनीय सोहळा याची देही याची डोळा पहाणे म्हणजे आनिंदाचे डोही आनंद तरंगे हि अवस्था प्रत्यक्ष अनुभवणे होय.
पर्यटन :-
किनार्यावर हौशी पर्यटकां साठी बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. घोडा गाडी फेरी, अनेक पाण्यावरच्या बोटी, वेगवेगळे वॉटर गेम्स ही येथे आहेत. तसेच नारळ पाणी आणि इतर खाद्य पदार्थ विक्री करणारे छोटी दुकाने, हातगाड्या किनार्यालगत आहेत.
संध्याकाळी सूर्य जसा अस्ताला जातो तशा होड्या किनार्याकडे परतू लागतात. मासेमारी साठी जाणारे कोळी बांधव खांद्यावर जाळे सावरत घराकडे परतीच्या दिशेने चालू लागतात. त्यांची पाठमोरी पुसट होणारी आकृती आणि समुद्रात हळू हळू गडप होणारे सूर्याचे बिंब बघणे हा एक सुरेख अनुभव असतो. सुर्यास्ता इतकाच इथला सूर्योद्याचा देखावा देखील अवर्णनीय असतो. हा अनुभव घेण्यासाठी आणि इतिहासाचा वारसा लाभलेला कुलाबा किल्ला बघण्यासाठी अनेक पर्यटक अलिबागला भेट देत असतात.
किल्ल्यावर रहाण्याची व जेवण्याची व्यवस्था नाही. अनेक सुख सोयी असलेली अलिशान हॉटेल्स इथे आहेत तसेच घरगुती पद्धतीने रहायला ज्यांना आवडते त्यांच्यासाठी भरपूर पर्याय इथे उपलब्ध आहेत. कोकणी पद्धतीचे जेवण मासे यांचा आस्वाद घेण्यासाठी अनेक खवय्ये अलिबागला भेट देत असतात.
किल्ल्यावर कसे पोहोचायचे :
कुलाबा किल्ल्यावर जाण्यासाठी प्रथम अलिबाग शहरात यावे लागते. मुंबई , पुणे येथून अलिबागला येण्यासाठी सार्वजनिक वहातुक व्यवस्था आहे. एस टी महमंडळाच्या बस सुविधा आहे. तसेच मुंबई येथून येण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया ते मंढवा बोटीची सोय आहे. पुढे मांढवा ते अलिबाग बस सुविधाही आहे.
- मुंबई ते अलिबाग – 100 किमी.
- पुणे ते अलिबाग – 145 किमी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे.
- मुंबई ते अलिबाग प्रवास बोटीने सुद्धा करता येतो. Gate way of India पासून ते मांडवा समुद्रमार्गे व नंतर रस्त्याने अलिबाग पर्यंत पोहोचता येते
अलिबाग समुद्र किनाऱ्यावर आले असता ओहोटी ची वेळ असेल तर चालत किल्ल्यात जाता येते. भरतीच्या वेळी मात्र किल्ल्यात जाता येत नाही. भरती-ओहोटीच्या वेळापत्रक किनाऱ्यावर लावले आहे.
भेट देण्यासाठी योग्य वेळ :
कुलाबा किल्ल्याला भेट वर्षातून कधीही देता येऊ शकते. परंतु पावसाळ्यात इथे मुसळधार पाऊस पडत असतो त्यामुळे पावसाळ्याचे ४ महिने टाळून भेट देणे योग्य. किल्ल्यावर जाताना भरती ओहोटीच्या वेळा बघूनच जावे त्यासाठी स्थानिक वेळापत्रक दिलेले आहे त्याचा अंदाज घेऊनच किल्ल्याची सहल करावी.
जवळील आकर्षणे-
- कान्होजी आंग्रे स्मारक (१ किमी )
- हिराकोट तलाव (१ किमी )
- कनकेश्वर मंदिर ( १५ किमी )
- खांदेरी किल्ला (७ किमी )
- आक्षी समुद्रकिनारा (८ किमी )
- नागाव समुद्रकिनारा (९ किमी )
- सिद्धेश्वर धबधबा (१२ किमी )
- कोंडी धबधबा (२१ किमी )