मुरुड जंजिरा- तीन बाजूनी डोंगर आणि पश्चिमेला अरबी समुद्र, आणि मधोमध वसलेले नारळी पोफळीच्या बागांनी आच्छादलेले कोकण किनारपट्टीवरील सुंदर गाव. मुरुड ज्याप्रमाणे येथील सुंदर किनाऱ्यासाठी व सागरी किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे त्याच प्रमाणे मुरुडचा इतिहास सुद्धा फार मोठा आहे. याच इतिहासाची साक्ष येथील काही पुरातन मंदिरे देतात. आणि त्यातीलच एक असे श्री भोगेश्वर मंदिर. नवीन S. T. स्टॅन्ड जवळील भोगेश्वर पाखाडीच्या शेवटी हे पुरातन मंदिर अजूनही चांगल्या स्थितीत असलेले पाहावयास मिळते.
साधारणतः ३५० ते ४०० वर्षे जुने असे हे मंदिर मुरुड येथील इतिहासाची साक्ष देते. अलिबाग परिसरामधील पुष्कळ अशा पुरातन मंदिरांप्रमाणेच मुरुडमधील भोगेश्वर पाखाडी जवळील हे मंदिर कौलारू आहे. पण इतर बऱ्याच मंदिरांमध्ये जसे दगडी नक्षीकाम आढळते तसे या मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुंदर लाकडी नक्षीकाम केलेले आढळते.
शिवकालीन कलेचा एक उत्तम नामना आपल्याला ह्या मंदिरामध्ये पाहायला मिळतो. बाहेर असलेला व्हरांडा ओलांडला कि आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. समोरच लाकडी नक्षीदार कमानी असलेला लाकडी सभामंडप पाहायला मिळतो. आणि नंतर श्री भोगेश्वराचा गाभारा आणि त्याच्यावर छोटासा घुमट. या काळामधील बहुतांश मंदिरे घरासारखी दिसत व आतमध्ये छोटासा घुमट बांधण्यात येई. सभामंडपाभोवती वरच्या बाजूस पोटमाजला आहे. व त्याच्या भोवती सुद्धा वरच्या बाजूला साधरणतः २० नक्षीदार लाकडी कमानी आहेत. वरच्या बाजूस आतून असलेल्या छताला सुद्धा लाकडी फळ्या बसवलेल्या आहेत, आणि त्यावर सुंदर रंगकाम केलेले दिसते. मंदिरामधील सर्व खांब लाकडी असून हे सर्व खांब दगडांवर उभे केलेले आहेत आणि याच खांबांवर सभामंडप उभा आहे. मंदिराच्या पोटमाजल्यावर जाण्यासाठी उजव्या बाजूने लाकडी जिना आहे. मंदिराच्या सर्व खिडक्या लाकडी असून त्यास झडपे सुद्धा लाकडी आहेत, व प्रतेय्क खिडकीला लाकडी नक्षीदार कमान आहे.
मंदिरासमोर एका दगडी चौथऱ्यावर एक दीपस्तंभ आहे. या समोर एक छोटा रस्ता व त्यापलीकडे एक मध्यम आकाराची जुनी बारव (पायऱ्यांची विहीर )आहे. पावसाळ्यामध्ये हि बारव पूर्णपणे भरून जाते. श्रावण महिन्यातील दर सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिराच्या आजूबाजूला पाहिले तर बऱ्याच प्रमाणात पुरातन दगडी अवशेष दिसून येतात, हे दगडी भाग बहुधा दीपस्तंभाचे किंवा बांधकामाचे असावेत. मंदिर परिसरामध्येच अजून एक श्री गणेशाचे पुरातन मंदिर आहे.
Amenities
- Bike Parking
- Car Parking
- Friendly workspace