रायगड जिल्ह्यातील मुरुड जसे ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे आहे तसेच मुरुडला नैसर्गिक सौन्दर्याचे वरदान सुद्धा मिळाले आहे.
मुरुड पासून केळघर मार्गे रोह्याकडे जाताना साधारणतः ४ ते ५ किमी अंतरावर गारंबी नावाचे छोटेखानी धरण आहे. याच धरणांमधून पूर्वी मुरुड गावाला पाणीपुरवठा होत असे. पूर्वी मुरुड ची लोकसंख्या फार कमी असल्याने यथील पाणी मुरुडला पुरत असे, पण आता खारआंबोली धरणातून पाणी मिळते. तर गारंबी धरणालाच लागून मोठाले कातळ आणि डोंगर उतार असल्याने पावसामध्ये येथे खळखळणारे व फार मनमोहक धबधबे वाहू लागतात. आणि जवळचे गावकरी व पर्यटक येथे आकर्षिले जातात.
घनदाट व हिरवेगार जंगल, शांत वातावरण, खळाळणाऱ्या पाण्याचा सुमधुर आवाज, मधूनच येणारी उन्हाची सुखावणारी तिरीप, आणि सोबतीला पक्षांचा किलबिलाट. निसर्गाचे सौन्दर्य आणि किमया काय असते त्याचा खरा प्रत्यय येथे येतो. एखाद्या चित्रपटामध्ये दिसावा असा सुंदर देखावा. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात डोंगर असल्याने तेथील पाणी वहात याठिकाणी येते आणि येथे बांधलेल्या बंधाऱ्यांमध्ये साचते. पुढे हेच पाणी समुद्राला जाऊन मिळते. प्रवाह खडकाळ असल्याने येथे अतिशय मनमोहक छोटेखानी धबधबे तयार होतात.
रांजणखळगे – डोंगरातून वाहत येणारे पाणी खडकाळ प्रवाहातून वाहताना नैसर्गिकरित्या येथे तयार झालेले छोटे रांजण खळगे दिसून येतात. साधारणतः १ ते दीड फूट खोली व १ फूट रुंदी असलेले १५ ते २० रांजण खळगे येथे आहेत.
मुरुडच्या सौन्दर्यामध्ये भर घालणारे हे अजून एक मनमोहक ठिकाण, आवर्जून पाहण्यासारखे.
हे ठिकाण पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने येथे कोणत्याही प्रकारचा कचरा कृपया करू नये, आणि येथील सौन्दर्य अबाधित राहील याची काळजी घ्यावी.