नागावमधील तीन ऐतिहासिक मंदिरांपैकी एक म्हणजे नागेश्वर मंदिर. आंग्रेकालीन अष्टागरांपैकी एक असलेल्या नागावच्या मधोमध असलेले हे ऐतिहासिक नागेश्वर मंदिर. समोरच एक मोठा ऐतिहासिक तलाव आहे.
नागेश्वर मंदिर –
कौलारू असलेले हे दुमजली मंदिर पूर्णतः दगडी बांधकामात आहे. मंदिराच्या सुरुवातीला छोटासा व्हरांडा असून लगेच मोठा सभामंडप आहे, व नंतर गाभारा. बाहेरील व्हरांड्यामध्येच लाकडी जिना आहे ज्याने आपल्याला वरील मजल्यावर जात येते. सभामंडपामध्ये डावीकडे गणपती तर उजवीकडे काळभैरवाची मूर्ती आहे. गाभार्याच्या प्रवेशद्वाराजवळच डावीकडे दगडी नंदी आहे. दरवाजाच्या वरती मध्यभागी ज्याला ललाट बिंब म्हणतात तेथे गणपती आहे आणि खालच्या बाजूला कीर्तीमुख दिसून येते. गाभाऱ्यामध्ये मधोमध शंकराची पिंडी आहे तर मागच्या बाजूला पार्वतीची मूर्ती आहे. एका कोपऱ्यामध्ये दिवा लावण्यासाठी असलेला छोटा दगडी स्तंभ दिसून येतो. सभामंडप चौरसाकार असून त्याचे छत गोलाकार आहे. वरच्या बाजूला एक छोटासा मजला असून लाकडी व कौलारू छत आहे. तर गाभार्याच्या वर छोटासा नक्षीदार घुमट आहे. मंदिरासमोर एक जुने तुळशी वृंदावन दिसते तर नव्याने दुरुस्त केलेली दीपमाळ सुद्धा आहे.
इतिहास –
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. हे मंदिर सुद्धा यातीलच एक. हे मंदिर शिवकालीन असावे असा अंदाज, कारण या मंदिराचा जीर्णोद्धार ६ जानेवारी १७७२ रोजी सरखेल राघोजी आंग्रे यांनी केला. याच मंदिरासमोर १७७३ मध्ये राघोजी आंग्रे यांनी एक मोठा तलाव बांधला.
मंदिरासमोरील तलाव –
नागावच्या ज्या भागामध्ये हे मंदिर आहे त्याचे नाव हटाळे. म्हणून या तलावाला हाटाळ्याचे तळे सुद्धा म्हणतात. या तलावाच्या सर्व बाजू तांबड्या दगडामध्ये बांधलेल्या आहेत. तलावाला २ ठिकाणी पायऱ्या असल्याचे दिसते त्यामधील एका बाजूच्या मोठ्या पायऱ्या अजून वापरामध्ये आहेत. या तलावामध्ये ५ विहिरी आहेत. साधारणतः १९७० च्या आसपास ह्या विहिरी बांधण्यात आल्या. हे तळे आत्तापर्यंत कधीही आटल्याचे कोणाच्या पाहण्यात नाही.
उत्सव –
चैत्र शुद्ध पौर्णिमेला येथे नागेश्वराचे यात्रा भरते. याच परिसरामध्ये प्रत्येक गुरुवारी आठवडी बाजार भरतो, याला हाटाळ्याचा बाजार म्हणतात.
ऐतिहासिक संदर्भ – रायगड गॅझेटेअर
Amenities
- Bike Parking
- Car Parking
- Fast-Food