रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात रेवदंडा हे गाव आहे. अलिबाग पासून १७ किमी वर रेवदंडा आहे. कुंडलिका नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या खाडीच्या मुखाजवळ रेवदंडा गाव आहे.
किल्ल्याचा इतिहास :
पोर्तुगीज कप्तान सोज याने १५२८ मध्ये किल्ला बांधायला सुरुवात केली. त्यापूर्वी १५१६ मध्ये पोर्तुगीजांनी कारखान्यासाठी इमारत बांधली, तिला चौकोनी बुरुज म्हणतात. हिची तटबंदी १५२१ ते १५२४ च्या दरम्यान बांधली गेली. २२ जुलै १६८३ च्या रात्री मराठ्यांनी रेवदंड्याला वेढा घातला. तो मोडून काढण्यासाठी पोर्तुगीजांनी फोंड्यावर हल्ला केला. त्यामुळे मराठ्यांना वेढा सोडून जावे लागले. २५ नोव्हेंबर १७४० रोजी झालेल्या तहानुसार पोतुगीजांनी साष्टीतील गावांच्या बदल्यात रेवदंडा व कोर्लईचा ताबा मराठ्यांना दिला. १८०६ मध्ये इंग्रजांनी याचा ताबा घेतला. १८१७ मध्ये आंग्र्यांनी हा गड जिंकला. पण लगेच १८१८ मध्ये रेवदंडा किल्ला इंग्रजाकडे गेला.
किल्ल्याची माहिती :
रेवदंडा किल्ल्याच्या तटबंदीचा परिघ ५ किमी आहे. तटबंदी पूर्ण गावाला वेढत असल्यामुळे बहुतेक ठिकाणी ती खाजगी मालमत्तेत गेल्यामुळे पाहाता येत नाही. रेवदंड्यात जाणारा रस्ता तटबंदी फोडून बनवलेला आहे. त्या तटबंदीच्या उजव्या बाजूने गेल्यास आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशद्वारावर पोर्तुगीजांचे राजचिन्ह कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आत अजून एक दार आहे. त्याच्या पूढे ३ मोठे दगडी गोळे पडलेले दिसतात. दरवाज्याच्या माथ्यावर जाण्यासाठी जिना आहे. त्याने वर गेल्यावर भिंतीमध्ये अडकलेला एक तोफ गोळा दिसून येतो. त्यानंतरचे दुर्गावशेष किनार्याजवळ आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे तटबंदी खाली असलेला भुयारी मार्ग. या भुयारात शिरायला ६ मार्ग असून सर्व प्रवेशद्वारे बंद आहेत. रेवदंडा किल्ल्यावर सातखणी मनोर्याचे सात पैकी चार मजले बाकी आहेत. या मनोर्याला ‘‘पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार‘‘ म्हणत. कारण या मनोर्यावरुन उत्तरेला मुंबईपर्यंत व दक्षिणेकडे जंजिर्यापर्यंत टेहळणी करता येत असे. या मनोर्याच्या पायथ्याशी तोफा पडलेल्या आहेत. याशिवाय चर्चचे अवशेष, घरांची, वाड्यांची जोती हे अवशेष आहेत.
किल्ल्यावर जाण्याचा मार्ग :
मुंबई ,पुणे हून रेवदंड्याला जाण्यासाठी थेट बसेस आहेत. रेवदंडा बस स्थानकावर उतरुन किनार्यावरुन किल्ला पाहायला जाता येते.
- अलिबाग रेवदंडा अंतर १७ किमी
- अलिबाग पुणे अंतर : १४५ किमी
- अलिबाग मुंबई अंतर :१२० किमी
जवळचे आकर्षण –
- फणसाड अभयारण्य (४ किमी)
- कोर्लई किल्ला (४ किमी)
- मुरुड जंजिरा (२८ किमी)
- काशीद बीच (१० किमी )