अलिबाग पासून ४-५ किमी अंतरावर थळ हे गाव आहे. थळच्या किनाऱ्या पासून ३ किमी अंतरावर खांदेरी हे बेट आहे. या बेटावर साधारण इ.स १६७९ साली शिवाजी महाराज यांनी मायनाक भंडारी याला पाठवून हा किल्ला बांधून घेतला.
किल्ल्याचा इतिहास :
छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुंबई समोरील खांदेरी बेटावर किल्ला बांधण्याची मायनाक भंडारी ला आज्ञा केली. महाराजांचा आदेश मिळताच मायनाक भंडारी ने खांदेरी बेटावर असलेल्या टेकडीला तटबंदी करण्यास व किल्याच्या बांधकामास सुरुवात केली. पण ही बातमी जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी च्या इंग्रज अधिकाऱ्यांना समजली तेव्हा या कामात अडथळे आणण्याचा बराच प्रयत्न या इंग्रज अधिकाऱ्याने केला. मायकानास बांधकाम थांबवण्यास सांगण्यात आले तेव्हा “मी शिवरायांचा हुकूम मानणारा सेवक आहे तुम्ही आदेश देणारे कोण?” असे रोखठोक प्रति उत्तर मायनाक यांनी पाठविले. १६७९ साली थळच्या किनार्यावर इंग्रजां बरोबर अनेक लहान मोठ्या चकमकी उडाल्या. इंग्रजी आरमार पाठवून हा मनसुबा मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मायनाक भंडारी च्या मदतीला नंतर दौलतखानाचा आरमारी ताफा आला. आलिबाग-थळच्या किनाऱ्यालगत असलेल्या या आरमाराने इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या. इंग्रजांची मोठी जहाजे वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून होती. त्यामानाने मराठी आरमारातील छोट्या होड्याना स्थानिक लोकांना भरती ओहोटी, वारे, समुद्रातील खडक यांचा चांगला अंदाज होता त्यामुळे इंग्रजी आक्रमणाला मराठी आरमाराने चांगली टक्कर दिली. आणि किल्ल्याची उभारणी झाली. इंग्रजांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारी सामर्थ्य मान्य करावे लागले. १७७५ साली खांदेरी इंग्रजांच्या ताब्यात होता. १७८७ साली राघोजी आंग्रेंनी किल्ल्याचा ताबा घेतला. १८१४ साली खांदेरीचा ताबा दुसरा बाजीराव पेशवे यांच्याकडे गेला. पुन्हा १८१७ रोजी खांदेरीचा ताबा आंग्रेजवळ आला.
किल्ल्याची माहिती :
थळ समुद्र किनाऱ्या वरून स्थानिक बोटीने या किल्यात जाता येते. किल्ला फार प्रसिद्ध नाही पण मुंबई समोरील बेटावर होता त्यामुळे महत्वाचा होता. किल्यावर पडझड झालेली आहे. पण तटबंदी अजून शाबूत आहे. बेटावर एक टेकडी आहे या टेकडीलाच तावेली तटबंदी घालून किल्ला बांधला गेला.
वेताळ मंदिर:
या बेटावरील वेताळ मंदिर प्रसिद्ध आहे. जिथे एक विशाल दगड वेताळ किंवा आत्मा म्हणून पूजला जातो. लोकसाहित्य सांगते की दरवर्षी दगड आकारात वाढतो. होळीच्या वेळी दरवर्षी यात्रेकरु पूजेसाठी येतात. कोळी बांधव तिथे पूजा करूनच मासेमारी साठी आपल्या नावा समुद्रात घालतात.
दीपगृह :
या बेटाचा भाग पाण्या पासून २० ते २५ फुट उंचीवर आहे तिथे बोटीचा धक्का आहे. बेटाच्या भोवतीचा भाग खडकाळ आहे. या खडकामुळे बोटिना अपघात होऊ नये म्हणून येथे दीपगृह उभारण्यात आले. बोटींना मार्गदर्शन करण्यासाठी हे दीपगृह तेव्हापासून इथे दिमाखात उभे आहे.
“धातूचा” खडक :
जेट्टीच्या उजवीकडून समोरच्या बाजूला आल्या नंतर तिथे एक आश्चर्यकारक खडक दिसतो. या खडकावर दुसर्या दगडाने प्रहार केला असता तो खडक धातूच्या भांड्यासारखा आवाज निर्माण करतो. हा खडक अनोखा आहे.
किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग :
अलिबाग पासून ४ ते ५ किमी अंतरावर थळ हे गाव आहे. तेथील समुद्र किनार्यावर गेल्यानंतर स्थानिक कोळी बोटीने पर्यटकांना किल्यावर घेऊन जातात. हवामानाची स्थिती पाहून किल्ल्यावर जाता येते.
- अलिबाग थळ: ५ किमी
- अलिबाग पुणे : १४५ किमी
- अलिबाग मुंबई :१२० किमी
जवळचे आकर्षण –
- मांडवा जेट्टी (१५ किमी )
- करमरकर शिल्पालय (१६ किमी )
- अलिबाग समुद्रकिनारा (५ किमी )
- किहीम समुद्रकिनारा (१० किमी )