“अलिबाग किनारा” हा कोकणातील सर्वात प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. अल्हाद दायक वातावरण आणि सुरुची गर्द झाडे या किनाऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर टाकतात.
पर्यटन –
अलिबाग बसस्थानका पासून २ कि.मी. अंतरावर असलेल्या किनाऱ्याला अनेक भारतीय तसेच परदेशी पर्यटक भेट देतात आणि या ठिकाणी उपलब्ध असलेल्या विविध जलक्रीडा प्रकारांचा मनमुराद आनंद घेतात. बनाना राइड्स, जेट स्कीस, फिशिंग ट्रिप्स, पॅरा मोटर राइड्स आणि बम्पी राईड्स सारखे वाटर स्पोर्ट्स पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटक अलिबाग किनाऱ्यावरून सुर्यास्ताचा आनंद घेऊ शकतात. अलिबाग समुद्र किनाऱ्याच्या आसपास अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे एक दिवसाच्या सहली साठी हे उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात या समुद्र किनार्याचे अधिक आकर्षण वाटते. अलिबाग मध्ये पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. त्यात अनेक कॉटेजेस, बीच रिसॉर्ट्स आहेत. बीचवर आनंद घेण्या व्यतिरिक्त पर्यटकांना स्थानिक खाद्य पदार्थांचा आनंद लुटणे देखील आवडते. खास कोकणातील चवीचे घरगुती जेवण देखील इथे आसपास सहज उपलब्ध आहे. मासे खाण्याचा आनंद घेण्यासाठी खवय्ये अलिबाग ला भेट देतात. पुणे व मुंबई पासून जवळ असल्याने अलिबाग किनाऱ्यावर वीकेंडला येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे.
कुलाबा किल्ला –
या समुद्र किनार्यास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला “कुलाबा किल्ला” हा या समुद्र किनाऱ्याचे आकर्षण आहे. या किनाऱ्यावरून “कुलाबा किल्ला” अगदी नजरे समोर दिसतो. या किल्ल्यावर घोडागाडीतून सुद्धा जाता येते. तसेच ओहोटीच्या वेळी पाणी अगदी किल्ल्याच्या पलीकडे जाते, तेव्हा चालत या किल्ल्यात जाता येते. किल्ल्यामध्ये जाताना समुद्राच्या भरती ओहोटीचे वेळापत्रक पाहूनच किल्ल्यामध्ये जावे.
सेल्फी पॉईंन्ट –
अलीकडेच समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी पॉईंट बनवला आहे. जवळ जवळ सगळ्याच पर्यटकांचे हक्काचे बनलेले सेल्फी काढायचे ठिकाण .
T55 रणगाडा –
पाकिस्तानला १९७१ च्या लढ्यात नामोहरम करणारा भारतीय सैन्यदलातील टी-५५ रणगाडा(t-55 tank) अलिबागच्या समुद्रकिनारी पाहावयास मिळतो. हा रणगाडा सुद्धा पर्यटकांचे एक मुख्य आकर्षण बनलेले आहे .
इतर आकर्षणे –
अलिबाग किनाऱ्यालगत भूचुंबकीय वेधशाळा हे एक मुख्य आकर्षण आहे . जवळच J.S.M. कॉलेज आहे . वरसोली किनाऱ्यावर इथून पायी जाता येते . येथून डावीकडे आक्षी व नागाव चा समुद्रकिनारा दिसतो, तर उजवीकडे खांदेरी व उंदेरी असे दोन ऐतिहासिक किल्ले पाहावयास मिळतात.
जवळील आकर्षणे-
-
- कान्होजी आंग्रे स्मारक (१ किमी )
- हिराकोट तलाव (१ किमी )
- खांदेरी किल्ला (७ किमी )
- आक्षी समुद्रकिनारा (८ किमी )
- नागाव समुद्रकिनारा (९ किमी )
- कनकेश्वर मंदिर ( १५ किमी )
कसे पोहोचावे –
- मुंबई ते अलिबाग – 100 किमी.
- पुणे ते अलिबाग – 145 किमी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे.
- मुंबई ते अलिबाग प्रवास बोटीने सुद्धा करता येतो. Gate way of India पासून ते मांडवा समुद्रमार्गे व नंतर रस्त्याने अलिबाग पर्यंत पोहोचता येते