अलिबागकडून दक्षिणेला ५० किमी वर मुरुड गाव आहे. मुरुडकडे जाताना वाटेमध्ये आक्षी, नागाव, चौल, रेवदंडा, कोर्लई, काशीद, नांदगाव अशी प्रसिद्ध ठिकाणे लागतात. अलिबाग ते रेवदंडा हा प्रवास आपण गर्द नारळी आणि पोफळीच्या हिरव्यागार झाडांनी आच्छादलेल्या गावांमधून करतो, नंतर मात्र आपल्या नजरेस पडतात ते डाव्या बाजूला हिरवेगार डोंगर व उजव्या बाजूला अथांग पसरलेला समुद्र. मुरुड मध्ये प्रवेश करताना उजव्या बाजूला दिसतो तो सिद्धी राजवाडा आणि पलीकडे लांबच लांब पसरलेला स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा.
मुरुडमध्ये प्रवेश केला कि लगेच उजव्या बाजूला पूर्ण समुद्रकिनारा लागतो. ह्या किनाऱ्याचे वैशिष्ट्य असे कि हा पूर्णपणे ३ ते ४ किमी चा सरळ किनारा आहे. किनाऱ्यावर पाय ठेवला कि प्रथम समोरच दृष्टीस पडतो तो पद्मदुर्ग म्हणजेच कासा किल्ला. डाव्या बाजूला एकदरा किंवा दंडा राजपुरीचा डोंगर व दंडा राजपुरी किल्ला किंवा सामराजगड. उजव्या बाजूला दिसतो तो सिद्धीचा राजवाडा. समुद्रकिनाऱ्यावर Seagull पक्षी बऱ्याच प्रमाणात येतात
पर्यटन –
मुरुड अलिबाग पासून फक्त ५० किमी अंतरावर असल्याने येथे मुंबईहून बरेच पर्यटक येतात. पुण्याहून ताम्हिणी, कोलाड, रोहा, केळघर मार्गे मुरुड फक्त १५० किमी असल्याने येथून येणारे पर्यटक सुद्धा मुरुडला पसंती देतात. मुरुड येथे पर्यटकांसाठी आकर्षण अशी बरीच ठिकाणे आहेत, त्यातील समुद्रकिनारा हे एक. येथे पर्यटकांसाठी बरेच वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध असतात.
समुद्रकिनाऱ्यालगत अनेक हॉटेल्स उपलब्ध आहेत. येथे बरेच पर्यटक खास करून मासे खाण्यासाठी येतात. समुद्र किनाऱ्यावर एक वैशिष्ट्यपूर्ण माडाचे झाड आहे जे समुद्रामध्ये पूर्णपणे वाकलेले आहे.
उत्सव –
गणेशोउत्सवाच्या वेळी गणपती विसर्जन येथे समुद्र किनाऱ्यावरच केले जाते. यावेळी किनारा पूर्णपणे भाविकांनी भरून गेलेला असतो. सर्व भाविक, गणेशोत्सव मंडळे किनाऱ्यावर गणपती घेऊन येतात व आरती करून मग आपल्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देतात.
किनाऱ्यावर नववर्षाचे स्वागतसुद्धा मोठ्या जोशाने व उत्साहपूर्ण केले जाते. नववर्षाच्या पूर्वसंध्येला विविध मनोरंजनाचे कार्यक्रम येथे होतात.
कसे पोहोचाल –
- अलिबाग मुरूड अंतर : ५० किमी,
- पुणे-मुरुड अंतर १५० किमी, (ताम्हिणी, कोलाड, रोहा, केळघर मार्गे )
- मुंबई-मुरुड अंतर १५० किमी
जवळचे आकर्षण –
- पद्म दुर्ग ( जवळच )
- कुडा मांदाड लेणी ( २१ किमी )
- जंजिरा किल्ला ( ६ किमी )
- काशीद समुद्रकिनारा ( २१ किमी )