अलिबाग पासून साधारण ७ किमी अंतरावर “आक्षी” हे गाव आहे. नारळ सुपारीच्या वाड्या आणि नागमोडी लहान रस्ते आक्षी गावाचे सौदर्य वाढवतात. समुद्रावर जाणारा रस्ता थेट गावातून जातो. अलिबाग मधील सुंदर समुद्र किनारा म्हणून “आक्षी” किनारा ओळखला जातो. शांतता आणि एकांत शोधत असलेल्यांसाठी आक्षी बीच एक उत्तम पर्याय आहे. येथील पाणी पोहण्यासाठी स्वच्छ आणि सुरक्षित आहे. आक्षी किनाऱ्या जवळ पसरलेले सुंदर सुरुचे बन देखील पर्यटकांना आकर्षित करते. अथांग पसरलेला समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा आणि दूरवर पसरलेले सुरूचे बन यामुळे आक्षी समुद्र किनारा सुंदर दिसतो. लाटांना चुकवत पाण्यात खेळणे आणि त्यानंतर वाळूत बसून सूर्यास्त बघणे हा एक अवर्णनीय आनंद असतो. आक्षीला येणारे पर्यटक अलिबाग आणि अलिबाग जवळील कुलाबा किल्ला देखील पाहू शकतात. आक्षी किनाऱ्याच्या उत्तरेकडील भागात मच्छिमारांची वस्ती आहे. जलतरणपटू आणि समुद्री प्रेमींसाठी आक्षी हे उत्तम स्थान आहे. आक्षी हा भारतातील स्वच्छ किनार्यां पैकी एक आहे.
ऐतिहासिक ठिकाणे –
आक्षी गावाच्या प्रवेश द्वाराशी जुना ऐतिहासिक स्तंभ आहे. गावाच्या सुरुवातीलाच काष्ठमंडप असलेलं सोमेश्वराचं एक सुरेखसं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूलाच रस्त्याच्या पलीकडे एक गधेगळ आहे. समुद्रकिनारी जातांना वाटेत एक ऐतिहासिक शिलालेख पाहावयास मिळतो . शिलाहारवंशीय राजा पहिला केसीदेवराय याचा प्रधान भइर्जू सेणुई याच्या काळात म्हणजे शिलाहार काळात कोरलेला हा शिलालेख आहे. त्यामुळे आक्षी गावाला ऐतिहासिक महत्व आहे.
पक्षी आणि पक्षीप्रेमीचे आवडते ठिकाण –
जगभरातील अनेक स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे अत्यंत पोषक वातावरणाचे ठिकाण असल्याने दरवर्षी पक्षी प्रेमी या समुद्र किनार्याला भेट देतात आणि येथील पाहुण्या पक्षांच्या प्रतिमा आपल्या कॅमेऱ्यात टिपतात. या पक्ष्यांमध्ये प्लेव्हर, सीगल्स, टेरन्स आणि बारटेल, गोडविट यांचा समावेश होतो.
पर्यटन –
आक्षी किनाऱ्यावर अनेक भव्य रिसॉर्ट्स आणि कॉटेज आहेत. या भागात बोटींग आणि बीच कॅम्पिंग ही आणखी एक लोकप्रिय सुविधा आहे. समुद्राचा दीर्घ सहवास निसर्गाचा आनंद आणि शहरापासून दूर शांततेचा आनंद घ्यायचा असेल तर “आक्षी” किनाऱ्याला भेट द्यायलाच हवी. मुंबई व पुण्या पासून जवळ असल्यामुळे विकएंड आणि इतर सुट्टीच्या दिवसात “आक्षी” किनाऱ्याला वारंवार भेट देणे सहज शक्य आहे.
जवळचे आकर्षण –
कसे पोहोचाल –
- अलिबागपासून अंतर – ७ कि. मी.
- मुंबई ते अलिबाग – १०० कि. मी.
- पुणे ते अलिबाग – १४५ कि. मी.
- स्थानिक वाहतूक उपलब्ध आहे